Wednesday, June 5, 2019

गोष्टी गावाकडच्या

            मे महिना शेवटाला लागला होता. यात्रेसाठी आलेले मुंबईकर परतीला लागले होते . यात्रेच्या आठवड्यात गाव कसे ओसंडून वाहत होते. गावात मुंबईकर आले की एक वेगळाच उत्साह सळसळत असायचा. मे च्या सुरुवातीला एक एक मुंबईकर गावी उतरायला लागला की मस्त वाटायचे. भले तो आपल्या घरचा नसला तरीही. आता बरेचसे मुंबईकर परतले होते . त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही. पाऊस सुरू होण्यापूर्वी सुखरूप पोहचलेले बरे म्हणून मुंबईकर मे संपायला रवाना होतात. पंधरा दिवस गजबजलेलं गाव आता भकास वाटायला लागते. त्यात उन्हाळा एवढा मरणाचा असतो की कुठेच मन रमत नाही . ही अवस्था सगळ्यांचीच झालेली असते. असाच अजित कट्टयावर एकटा उदास चेहरा करून बसलेला. दोन दिवसांपूर्वी वळीव जोराचा पडला होता त्यामुळे गरमा आणखी वाढला होता. जीवाची नुसती काहिली काहिली होत होती. अजितचे पंधरा दिवस कसे भुर्रकन उडून गेले हे त्याला कळलेही नव्हते. त्याच्या शेजारी असणारे तन्मय - चिन्मय कालच मुंबईला परतले होते. त्यांचा निरोप घेताना याच्या डोळ्यात पाणी साचले होते. चिन्मय - तन्मयचे वडील मुंबईलाच राहतात त्यामुळे ते  दिवाळी आणि मे मध्ये फॅमिली सोबत गावी पंधरवडा येत असतात. एरव्ही त्यांच्या घराला कुलूप असतो.  नाही म्हणायला गावात घरपती मुंबईकर होता. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी घर मोकळे मोकळे वाटत असणार.
           अजित यावर्षी तिसरीतुन चौथीत जाणार होता. शाळा चालू व्हायला अजून दहा दिवस शिल्लक होते. त्याने सकाळीच गल्लीतल्या मित्राच्या घरी एक राऊंड मारून आला होता पण त्याच्या मित्राच्या घरी अजून कोणीतरी पाहुणे होते म्हणून बाहेरूनच परतला.  यात्रा संपल्यावर दोन तीन वळीव झाले होते. आता हळूहळू सगळे शेताकडे सकाळ - संध्याकाळ जाऊ लागले होते.  दुपारच्या या उन्हात तर कामे होणार नव्हती. अजितला सकाळची ड्युटी होतीच, म्हैशी फिरवून आणायची. फक्त ती यात्रेत चार दिवस चुकली होती. म्हैशीना चरायला तर काही नव्हते पण तेवढेच त्यांचे पाय हलखे करून धरणाला धुऊन आणायचा. गावातील जाणती मंडळी भाताची सड , उसाची खोडवी वेचायला जायची. शेत साफ केले तर पिकणार. अजितच्या घरची शेती अशी जास्त नव्हती. अर्धा एकरच्या जवळपास होती. ती पण एक ठिकाणी नव्हती. एक तुकडा वरच्या माळाला आणि एक पान माळ्याजवळ . माळाला भुईमूग असायचा आणि दुसरीकडे पावसाळ्यात भात थोडंफार व्हायचे आणि हिवाळ्यात झाला तर थोडा हरभरा. घरचे पाणी नसल्यामुळें पुढच्या पिकाचे काही खरे नव्हते. त्यामुळे त्याचे आई-वडील रोजदंरीवर पण कामाला जायचे. उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असतात त्यावेळी ते गवंड्याच्या हाताखाली जायचे.
         आता सगळे पुन्हा जुने मित्र भेटू लागले . एकत्र खेळू लागले. गल्लीतील पोरे या दरम्यान शेंगा फोडायला दुसऱ्याच्यात जात असत. यावर्षी पण गल्लीतील पोरे दुपारी शेंगा फोडायला जाऊ लागली होती. ज्याची भरपूर शेती असायची त्यांना पेरणीला शेंगदाणे भरपूर लागणार होते . मग एवढे शेंगदाणे घरच्याने काय फोडून होणार नव्हते. मग आजूबाजूच्या गल्लीतल्या पोरांना बोलविले जायचे. एक मापट्याला ५० पैसे दिले जायचे. मोठी सहावी - सातवीची पोरे दोन दोन मापटी फोडून रुपया घेऊन जायची. अजित लहान असल्याने त्याला कोणी बोलवत नव्हते. शिंद्यांचं भुईमुगाचं रान भरपूर होते. तिकडे दोन दिवस पोरे शेंगा फोडायला जात होती. दिन्या पण तिकडेच चालला होता . दारात खेळतेल्या अजित ला बघून म्हणाला

" आज्या , येतोस का शेंगा फोडायला , मापट्याला आठ अणे देत्यात. "

अजित कसानुसा चेहरा करत म्हणाला -  "माझं मापटं भरलं का ?"

दिनेश - " आरं चल भरलं तर भरलं नायतर यीस परत ".

अजितला पण त्यांच्या सोबत जावे वाटायचे पण कधी कोण त्याला बोलवत नव्हते. घरी तर त्याला कधी खायला पैसे मिळायचे नाहीत. त्याला पैसे मिळाले की क्रिकेटचे स्टिकर जमवायचे होते . सौफच्या पुडीत क्रिकेट प्लेअरचे स्टिकर असायचे आणि मसाले वाली सौफ . आज संधी आली आहे तर त्याला दवडायची नव्हती. दिनेश त्याचा गल्लीतला मित्र. गल्लीच्या शेवटाला रहायचा. दोघे शिंद्यांच्या घरात गेले . आधीच बरीच पोरे पेले (ग्लास ) , चिट्टी (धान्य मोजायचे लहान माप ), मापटे , भांडी घेऊन शेंगा फोडायला बसली होती.  याना बघून शिंद्याची म्हातारी म्हणाली

" येवा रं पोरानु , बसा हिकडं . "

शेंगचे एक मोठे पोथे आडवे केले होते . सगळे त्याच्यातल्या शेंगा घेऊन फोडत बसले होते. दिनेश आणि अजित पण शेंगा फोडायला बसले. त्यांना पण दोन  भांडी दिली. भांडी जरा मोठीच होती. शिंद्याच्यानी आज जवळ जवळ अर्धी भांडी बाहेर काढली की काय असे वाटत होते. अजितच्या शेतात शेंगदाणे लागायचे पण थोडेच. त्यांचे शेतच होते केव्हढे. घरचे शेंगदाणे फोडताना हा वाटी, ग्लास , चिट्टी घेऊन बसायचा. पहिला वाटी भरायचा , मग वाटी - वाटीने ग्लास , आणि ग्लास ने चिट्टी..मापट्या पर्यंत काय मजल गेली नव्हती. इथे तर त्याला मोठे भांडेच मिळाले होते. दहा मिनिटे झाली अजून तर त्याचा तळ पण भरला नव्हता. शेंगांचे(बियाणे) पण बरेच प्रकार होते. काही फोडायला हलक्या जायच्या तर काही जड. तशा खायला ही काही जड होत्या म्हणजे पचायला. काळू- बाळू , फुलप्रगती या शेंगा फोडायला हलक्या जायच्या पण अन्यगिरी लई जड . त्याची टरफल कडक असायची . फोडून फोडून मोठ्यांची बोटे दुखायची तर लहानांचे काय? . तास- दीड तास गेला, हळूहळू पोरे पैसे घेऊन पांगू लागली. दिनेश चे मापटे भरले त्याने ते म्हातारीला दाखवले आणि पैसे घेऊन तोही जाऊ लागला. त्यावेळी अजित त्याला म्हणाला

"थांब की माझं बी भरायला आलंय"

दिनेश - "घरला जाऊन येतो लगेट , म्हातारं बाबा एकटाच हाय घरात "

अजितचा नाईलाज झाला . त्याने फक्त मुंडी हलवली. तसा दिनेश निघून गेला. १५- २० मिनिटे झाली तरी अजितचे काय मापटे भरले नाही.अजून वाटी - दीड वाटी शेंगदाणे फोडावे लागणार होते. त्याला कंटाळा आला होता आणि  आता आपल्याच्याने काय मापटे भरणार नाही असे वाटू लागले. पण समोर म्हातारी फोडलेल्या शेंगाची फोलपटे गोळा करत होती. म्हणून हा गप्प एक एक शेंग फोडत होता. अजून तरी दिनेशचा काही पत्ता नव्हता. थोड्या वेळाने म्हातारी कायतरी आणायला आतल्या सोप्यात गेली तसे
अजित जागेवरून उठला , इकडे तिकडे पाहिले.  दुसरा कोणी असता तर जवळ भरलेल्या शेंगदाण्याच्या बुट्ट्या मधून शेंगदाणे घेऊन भरलेलं मापटे दाखवून पैसे पदरात पाडले असते पण अजित तसे काही न करता शेंगदाण्याने भरायला आलेले मापटे तिथेच ठेऊन घराच्या बाहेर पडला. अजितच्या मनात काय आले काय माहित. पायात चप्पल सरकवली आणि घराकडे धूम पळाला.

समाप्त

Tuesday, March 20, 2018

कवडा

कवडा

दिवाळीची सुट्टी चालू होती. वैभव शाळेच्या सुट्टीचा आनंद घेत होता. बाकी मुले खेळण्यात दंग असायची पण वैभवचं काही वेगळच चालायचं. त्याला खेळण्यापेक्षा रानात फिरायला आवडायचे. कधी एकटा तर कधी मित्रांसोबत. गुडघा गुडघा गवतातून पण बिनधास्त घुसायचा. यासाठी आई सोबत असली तर आईकडून तो शिव्या पण खायचा. अंगाने तसा किडमीडा , गोल सावळा चेहरा, भवऱ्याच्या तिथले डोक्यावरचे केस साळीन्द्रीच्या गणासारखे उभेच असायचे. पाणी लावून भांग पाडला तर ते तेवढया पुरते बसायचे पण थोड्या वेळाने परत उभारायचे त्यामुळे त्याला आपल्या केसांचा राग यायचा. त्याला इनशर्ट करायला आवडायचा नाही. तो भटकायला चालला की शर्टची खालची दोन बटणे काढून गाठ मारायचा आणि शर्टचे दोन्ही भाया वरपर्यंत फोल्ड करायचा. घरी एकदा मार खाल्ल्याने घरात साधा सरळ असायचा.
पक्षीतज्ञ सलीम अली यांच्यावरचा शाळेतील धडा वाचल्यापासून वैभवचे फिरणे तसे वाढले होते. त्याला तेच तेच आठवत राहायचे . सलीम अली याना लहान वयात बक्षीस मिळालेल्या छर्‍याच्या बंदुकीने पक्षी टिपण्याचा छंद लागला. एकदा त्यांनी टिपलेल्या चिमणीच्या गळ्यापाशी त्यांना पिवळा ठिपका आढळला. नेहमीच्या चिमणीपेक्षा ही चिमणी काहीतरी वेगळी भासल्याने त्यांची उत्सुकता चाळवली गेली. त्याबद्दल उत्सुकता वाढली आणि पुढे त्यांचे मन त्याच्यातच रमले. सुरुवातीला गळ्यावर ठिपका असणारी चिमणी आपण पण शोधायची असे वैभवने ठरवले पण यात त्याला काही यश नाही आले. पण रानावनात फिरताना मोर, पोपट, कबुतरे, चिमणी ,साळुंखी असे वेगवेगळे पक्षी पहायला मिळायचे . कधी कधी हा घरट्या जाऊन किंवा ढोलीत हात घालून त्यांची अंडी मिळतात का पाहायचा . एकदा - दोनदा तर कावळ्याने याला टोचले होते. त्याचा सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे पिल्लांना पक्षीण घास भरवतेले पाहत बसणे. कधी कधी ती पिल्ले उचलून घरी घेऊन जावी असे त्याला वाटायचे. त्याला सगळ्यात जास्त आवडायचा तो पक्षी म्हणजे कवडा. त्याचे कारण पण तसेच होते. त्याला एकदा शेजारच्या काकांनी कवडयाविषयी पेपरात आलेले एक कात्रण दिले होते आणि त्यातून त्याला एक खास गोष्ट समजली होती. कवड्यांची आपल्या पिल्लांना अन्न भरवायची एक खास सवय असते. इतर पक्षी आपल्या पिल्लांना अळ्या, किडे अथवा फळे आणून भरवतात. पण ह्या कवड्यांच्या नर मादी दोघांच्याही गळ्यात असलेल्या खास ग्रंथीमधे दूधासारखा द्राव यावेळी खास तयार होतो. त्यांची बारकी पिल्ले आई,बाबांच्या चोचीत चोच घालून हा द्राव पितात आणि मग त्यांची वाढ झपाट्याने होते.
कवडा पक्षी रानात वावरणारी कबुतराचीच एक जात. ती गावात ही आढळली जायची. कधी तारेवर बसलेली , रस्ताच्या कडेला किंवा घराच्या कौलावर. वैभवला मग नंतर कवड्याची घरटी शोधण्याचा छंद लागला . कुठे एखादा कवडा दिसला की तो एकदम सावध व्हायचा आणि कवडा जवळ पास कुठे घरट्यात जातो का पाहायचा. गवताच्या बीया किंवा इतर दाणे चोचीने टिपून तो उडून जायचा आणि वैभवची निराशा व्हायची. एरवी मित्रांसोबत असला तर जपून असायचा की त्यांना कळता कामा नये नाहीतर आपल्याला काही करता येणार नाही . सुट्टीच्या दिवशी एकदा सहजच तो शाळेकडे फिरत आला. तसे त्याचे मैदानात असलेल्या कवड्याच्या जोडीकडे लक्ष गेले. नक्कीच ती नर मादीची जोडी होती. तो हळू हळू कट्ट्याच्या आडाने पुढे पुढे सरकून एका खांभाच्या आडोश्याला थांबला. नर मादी दाणे टिपून घरट्याकडे परतली. त्यांचे घरटे व्हरांडयाच्या छताखाली होते . वैभवला कधी एकदा घरटे आणि अंडी पाहू झाले. कोणतरी जवळ येत असल्याची जाणीव झाली तसे नर मादी उडून गेले. वैभव मग हळू हळू खांबावर चढला. थोडेसे लटकून कवड्याचे घरटे आणि त्यातील ती दोन अंडी पाहू लागला. घरटे फारसे आकर्षक नव्हते पण ती दोन छोटी अंडी मस्तच वाटत होती. अंड्याना हात लावण्याचा मोह झाला पण त्याला कुणाचे तरी बोल लक्षात आले की एकदा का माणसाने अंड्याला शिवले की पक्षी परत त्या अंड्याला शिवत नाहीत. तो तसाच परत उतरला. बराच वेळ खांबाजवळ थांबला जेणेकरून परत नर मादी घरट्याकडे येईल पण ती जोडी काय परतली नाही. त्याच्या डोळ्यात आनंद चमकत होता. तो तसाच घरी परतला .

आता त्याचा रोजचा कार्यक्रम झाला. घरटे असलेल्या ठिकाणी एक चक्कर मारायचा. शाळा चालू असली की त्याला जवळून अंडी पाहता येत नव्हती पण तो दुरूनच कवडा अंड्यावर बसला आहे का नाही याची खात्री करायचा. एखाद्या वेळेस कधी संधी भेटली की हळूच खांबावर चढून अंडी पाहून घ्यायचा.
रविवारची सुट्टी होती. सकाळी सकाळी लवकरच तो शाळेकडे आला.नंतर खेळायला गर्दी झाली तर अंडी पाहायला मिळणार नाहीत. गडबडीने घरटे असलेल्या ठिकाणी आला. प्रथमतः आजूबाजूला पाहिले .कोणी नसल्याची खात्री झाल्यावर पटदिशी खांबावर उडी मारली आणि सरसर वर गेला. हळूच खापरी आणि आडव्या खांभाच्या सांधेत घुसला. जेणेकरून व्हरांड्याकडे पाहिले तर कोणाला समजणार नाही. आता तो अशा ठिकाणी आडवा होता की घरटे अगदी त्याच्या समोर होते. तो येण्या आधीच नर मादी दाणे टिपण्यास बाहेर गेलेली असावी. थोडासा पुढे झाला आणि त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. घरट्यात त्याला दोन कोवळी कोवळी पिल्ले दिसली. ज्यांचे अजून डोळे सुदधा उघडले नव्हते. ती आपली मान वर करून हालचाल करत होती. वैभव तर पिल्ले पाहून हरकून गेला. पाच एक मिनिटे तो तसाच अवघडून बसला. पिल्ले पाहण्यात गर्क झाला होता. पिल्लांची आई त्याना खाऊ घेऊन येईल आणि आपल्याला पाहून परत माघारी जाईल म्हणून तो खाली उतरला. आजूबाजूला पाहिले आणि घराच्या वाटेला लागला. आज तो भलताच खुश होता.
पंधरवडा गेला. पिल्ले थोडी मोठी झाली. हळूहळू पंख फुटू लागले. वैभव तर घरट्यावर पाळत ठेवून होता. वैभवच्या मनात पिल्लांविषयी आपुलकी निर्माण झाली होती. त्याना पाहण्यात त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळायची. त्या प्रेमापोटी , आपुलकी पोटी तो त्या पिल्लांना आपल्या घरी घेऊन जाणार होता. पण त्या बालमनाला हे माहित नव्हते की तो पिल्लांना आपल्या जन्मदात्री पासून वेगळे करणार होता. त्याचे आधीच ठरले होते की पिल्ले थोडी मोठी झाली की त्यांना घरी घेऊन जायचे. त्यासाठी त्याने आपल्या घराच्या भिंतीलगत विटांचे एक छोटे घर बनवले होते. त्या मध्ये एक दुसऱ्या पक्षाचे मोठेसे घरटे ठेवले होते. सगळी तयारी आधीच झाली होती. फक्त पिल्ले आणायची होती ती पण कुणाच्या नकळत. एक दिवशी संध्याकाळी एक नायलॉनची पिशवी घेऊन तो शाळेकडे गेला. शाळेपाशी सामसूम होती. घरटे असलेल्या खांबाजवळ आला. नर किंवा मादी या पैकी घरट्यात कोणीतरी एक होते. मादीच असावी. वैभव खांबावर चढू लागला तशी मादी घाबरून उडून जाऊन पलीकडच्या खांबावर बसली. वैभवने खांभावर चढून हळूच एक एक करून दोन्ही पिल्ले पिशवीत ठेवली. हे लांबून पक्षीण पाहुन सैरभैर झाली. पण ती काय करू शकणार नव्हती. वैभवने नेहमीप्रमाणे खांबावरून न उतरता आज अर्ध्या वरून उडी मारली आणि झपाझप पावले टाकत तो घराकडे वळला. आधीच अंधार दाटलेला,तो तसाच परड्यात गेला आणि भिंतीलगत बांधलेल्या विटांच्या घरातील घरट्यात त्या दोन पिल्लांना ठेवले. विटांनी ते छोटेसे घर व्यवस्थित बंद केले आणि तो घरात गेला. पिशवी एका कोपऱ्यात भिरकावली आणि जोंधळ्याच्या पोत्याजवळ गेला. पोत्याला असलेल्या लहान छिद्रातून अर्धी मूठ जोंधळा काढला आणि तो परड्याकडच्या दरवाज्यातून बाहेर पडला अन ती अर्धी मूठ त्या घरट्यात मोकळी करून आला.आता त्याला एक चिंता भेडसावत होती की पिलांना पाणी कशात ठेवायचे. इकडे तिकडे दोन घिरट्या खालून तो स्वयंपाक घरात शिरला. तसे आई त्याला म्हणाली
" काय चाललंय तुझं , पिशवी घेऊन काय केलास?"
कायतरी सांगायचे म्हणून वैभव बोलला " अभ्यासाची वही आणायला गेलतो"
आई भाकरी बडवण्यात व्यस्त झालेली पाहून याने हळूच एक कपाटातील वाटी उचलली आणि मुकाट्याने चालू लागला. त्याला वाटले आईचे लक्ष नसावे पण आईच ती " वाडगा काय कराय "?
तसे वैभवला काय सुचेना. तो पाहिजे मला म्हणून तसाच बाहेर आला . आईने पण दुर्लक्ष केले. त्याने हळूच घागरीतील पाणी वाटीत ओतले आणि परत पाठच्या दरवाजातून बाहेर पडला. अंधारात सावकाश पिल्लांजवळ आला . एक विट थोडीशी कोरी केली आणि पाण्याची वाटी आत ठेवली, नंतर परत वीट होती तशी लावली .
सकाळी उठल्या उठल्या त्याने पिल्ले गाठली. हळूच एक वीट कोरी केली. पिल्ले तर होती पण निस्तेज दिसत होती. दादा काय करतोय म्हणून सोनी पण दादा जवळ आली. तिने ती पिल्ले पहिली तशी ती ओरडली " अय्या , कसली पिल्लं ही" ?
ते ऐकून आई पण बाहेर आली. तिने पिल्ले पाहिली आणि जोराचा एक वैभवला पाठीत गुद्दा घातला. " कशाला आणलास ? मरायला काय ? होती तिथं ठेवून ये जा ती".
वैभव तसाच गप्प उभा. तशी आई म्हणाली " काय सांगालोय , जा ठेवून ये जा. नायतर बाबाकण मार खातोस बघ"
वैभव - " पिल्लं बाळगायची हाइत मला"
आई - " मांजरं खाऊन टाकतील तुझी पिल्लं, इथं कोंबड्या राहिनात आणि ह्यो पिल्ली बाळगतोय". सोडून आलास तर बरं".
वैभव - " हम्म"
तशी आई गेली . त्याने सोनीकडे हात वर करून मार द्यायला पाहिजे तुला असा हावभाव केला. परत ते त्या पिल्लांना पाहण्यात गुंतले.
वैभव ने एका पिल्लाला हातात घेऊन त्याची चोच वाटीतील पाण्यात बुडवली त्याने पाणी पिले की नाही हे काही समजले नाही. दुसऱ्या पिल्लाला पण त्याच प्रकारे त्याने पाणी पाजायचा प्रयत्न केला. पिल्लांनी धान्य खाल्ले नव्हते.अजून ती स्वतः खाण्याइतकी मोठी पण झाली नव्हती. परत आईची हाक आली तशी दोघेही वीट बंद करून आत पळाले. मग आत चहा वैगरे घेऊन दोघे हळूच परत बाहेर आले. वैभवने सोनीला शेंगदाणे आणायला सांगितले. सोनीने पळत जाऊन शेंगदाणे आणले. वैभवने जवळ असलेल्या पसरट दगडावर ते शेंगदाणे बारीक केले. सोनी हे सर्व कुतुहलाने पाहत होती. दादाने बारीक केलेले शेंगदाणे तिच्या हातात दिले आणि एका पिल्लाला बाहेर काढले. त्याची हळूच हाताने चोच उघडून त्यात बारीक केलेल्या शेंगदाण्याचा एक तुकडा टाकला. थोडा वेळ तो तसाच थांबला. पिल्लाने तो तुकडा गिळला तसे वैभवला बरे वाटले. मग त्याने थोडे थोडे करून दोन्ही पिल्लांना शेंगदाणे भरविले. पुन्हा दोघांची चोच पाण्याच्या वाटीत हळूच बुडवली. परत सर्व बंद करून दोघे बहिणभाऊ घरात गेले आणि शाळेची तयारी करून शाळेला गेले. शाळेत गेल्यावर पण त्याचे शाळेत लक्ष नव्हते. कधी एकदा दुपारची सुट्टी होईल असे झाले होते आणि एकदा दुपारची घंटा झाली तसा पळत वैभव घराकडे सुटला. आधी त्याने जाऊन पिल्ले पाहिली . आता ती बऱ्यापैकी हालचाल करत होती. विटांवर उन्हे येत होती म्हणून त्याने झाडाचा पाला तोडून विटांवर टाकला आणि जेवण करून शाळेला गेला.
दोन चार दिवस असेच गेले. रविवारची सुट्टी आली. पिल्ले आणलेली घरी सगळ्यांना माहीत झाले होते. बाबानी ऐकवले होते तरी त्याने आपला हट्ट सोडला नव्हता. रविवारची सुट्टी असल्यामुळे त्याला बाबा सोबत गवत आणायला शेताला जावे लागले. नऊ - साडे नऊच्या सुमारास तो शेतातून आला. कुठे ही गेला कि त्याचा जीव पिल्लामध्ये अटकत होता. आल्या आल्या तो पिल्लाकडे धावला . गेल्या गेल्या विटांनी बनवलेल्या छोट्याशा घराची एक वीट तशीच उघडी दिसली तसा तो चरकला . त्याने लगेच पिल्ले आहेत का पाहिली , पण त्याला काय पिल्ले दिसली नाहीत. त्याने आजूबाजूला पाहिले पण पिल्ले दिसायची शक्यता कमीच होती. आता सैरभैर होण्याची त्याची वेळ होती . तो घरात पळत गेला आणि बहिणीला विचारले
" तू गेली होती का तिकडे ? "
पण तिनेही नकारार्थी मान डोलावली तसे तो मोठ्याने रडू लागला . ते ऐकून आईने विचारले काय झाले रडायला. तसा तो म्हणाला
" तिथं पिल्लं नाहीत"
आई - " सांगितलं तर ऐकतोस कुठं " खाल्यासतील मांजराने"
वैभव - " मांजर काय विटा काढून खातंय" ? ' कोण तरी वीट काढलेली"
तसे त्याने सोनीकडे पाहिले. तशी ती घाबरीघुबरी झाली. कारण तीच पिल्ले बघायला गेली होती आणि वीट लावायची विसरून गेली . त्याने ओळखले तसे तिच्या डोकीवर जोरात दोन चार फटके मारले अन म्हणाला
" हिनच उघडलेलं"
मार बसताच तिनेही भोंगा पसरला. आईने सोनीला मारलेले पाहताच हातात काठी घेतली तसा वैभव रडत बाहेर पळाला. तसाच तो रडत त्या रचलेल्या विटांवर जाऊन बसला. त्याची पिल्ले गायब झाली होती. मांजराने खाल्ली की काय झाले हे त्यालाही माहीत नव्हते. त्याने मनाशी निश्चय केला कि परत पिल्ले कधी घरी आणायची नाहीत. त्यांना जगू द्यायचे ते त्यांच्या घरात , त्यांच्या घरट्यात . अजूनही त्याच्या डोळ्यातून आसवे वाहत होती.
समाप्त.

Monday, February 5, 2018

शेतवडी




          संध्याकाळ सातचा सुमार. बाहेर सगळं अंधारलेलं. गल्लीकडचा दरवाजा थोडा पुढं केला होता. पुढच्या सोप्यात गोठा होता. एका बाजूला म्हैशी आणि दुसऱ्या बाजूला बैलजोडी. बसतो म्हटलास तर बसायला जागा नव्हती. बैलांच्या पुढ्यात भरड्याच्या बुट्ट्या ठेवलेल्या होत्या आणि ती आपली मुंडी डोलवत त्यात गुतलेली. म्हैशींच्या पुढ्यात चगाळ टाकलेलं. ते काय त्यासनी गॉड लागलाय असं दिसतं नव्हतं.दोघी एकमेकींना शिंगाण डांगलत उभ्या होत्या. एक बारकं रेडकू गाडीच्या कण्याला बांधलेलं.. ते आपलं जोरात ताकत लावून कन्ना ओढून आपल्या आईकडं जायला बघत होतं.
मधल्या खोलीत एका जुनाट रेडिओचा खरखरत आवाज चालू होता. नक्कीच त्या सांगली केंद्रावरून सातच्या बातम्या चालू होत्या. म्हातारा खाटवर आड्याकड बघत पडलेला. कानावर पडणाऱ्या बातम्या ऐकत. खोलीत 40 चा बल्ब लावलेला. उजेड असून सुद्धा डिंम दिसत व्हतं.. पिंठ्या पुस्तक आणि वहीवर डब पडून अभ्यास करत होतं. त्याच अर्ध लक्ष अभ्यासात अर्ध रेडिओकडं. धूर बाहेर जाऊ दे म्हणून आईनं परड्याकडचा दरवाजा उघडला तर घरात कीडं यायला लागलं म्हणून पिंठ्यानं तो बंद केला. त्यातनं त्याला आई म्हणालीचं "अरं घुसमटल्यावणी व्हालय राहू दे की थोडा वेळ". पिंठ्या कुरकुरत म्हणाला "सगळं कीडं आत याल्यात आणि लाईटभवती फिरल्यात.. पुस्तकावरणं पडल्यात.. पिंठ्याच्या ध्यानीमनी ही नव्हतं धुरामुळं आईला किती त्रास होतोय ते. म्हातारीची देव घरात पूजा चालली होती. घरचा तरणा तेवढा घरात नव्हता. घरात सगळी असून सुद्धा माणसांचा उल्लंव नव्हता.
        इतक्यात लाईट गेली. लाईटीचा हा खेळ नेहमीचाच झालेला. सगळीकडं काळोखच दिसू लागला . देव घरातून थोडा उजेड जाणवत होता. पिंठ्याने मोठ्याने ओरडून आईला दिवा लावायला सांगितलं. वरच्या दिवळीतली चिमणी त्यानं सास्पून घेतली आणि हळूहळू पाय ओढत सरकू लागला. इतक्यात जेवण खोलीतून आई दिवा घेऊन आली. "ही घे चिमणी , गल्लीकडच्या सोफ्यात ठेव जा " . गल्लीकडच्या सोफ्यात दिवा ठेवून पिंठ्या परत अभ्यासाला लागला. म्हातारा लाईट गेली तशी उठून बसला. म्हातारी बी पूजा आटपून मधल्या सोफ्यात भुईला बसली. पिंठयाच आता अभ्यासात लक्ष नव्हतं. दिव्याभोवती फिरणाऱ्या किड्यांना पकडून तो जाळत बसला होता. म्हातारा ते बघून म्हणला बी " गप बस की कशाला चिमणीला कीडं जाळत बसलास". पण पिंठयाच काय तिकडं लक्ष नव्हतं. पिंठ्याच्या आईचं जेवण आटपलं तसं ती ही मधल्या उंबऱ्याला लागून भाजी नीट करत बसली. इतक्यात बाहेरून टीव्ही बघायला गेलेला सोन्या पण आला. घरात येताना त्यानं अंदाज घेतला बाप आहे की नाही. नसल्याची खात्री झाली तसं तो एकदम तऱ्हाट घुसला.


      बराच वेळ झाला , इकडच्या तिकडच्या गोष्टी पण संपल्या. चिमणीतलं तेल पण संपायला आलं पण तरण्याचा अजून काही पत्ता नव्हता. म्हाताऱ्यानं परत पाठ टेकलेली , जोरात तीन चार जांभया दिल्या. सोन्याला आईनं बाबाला बोलवायला पाठीवलं. जाता जाता पेंगुळलेल्या पिंठ्याला टपली मारून सोन्या बाहेर पळाला. सासवा-सुना जेवण खोलीत ताटं करायला गेल्या. इकडं सोन्या कुंभाराच्या कट्टीला जाऊन आला तरी काय बाबा दिसला नाही. पाटलाचा वाडा झाला, मोऱ्यांच्या मांडवात बघितलं बाबाचा काही पत्ता नाही. बराच वेळ झाला होता. अक्खी गल्ली पालथी घातली , पुढच्या गल्लीतल्या रहदारीच्या घरी पण जाऊन आला. सोन्याचा इकडं जीव भुकेने व्याकुळ झाला होता. सगळीकडं सामसूम झाली होती. सोन्या घराकडं निघाला. वाटत कुप्याचा आप्पा भेटला. तो झोपायच्या तयारीला लागलेला . झोपायच्या आधी ढोऱ्हासनी गवताचं बघत होता . सोन्याला बघून म्हणाला "काय रं जेवलास काय? सोन्याला काय सांगावं सुचलंच नाही. तो "हो" बोलला आणि घराकडं निघून आला.
आता पर्यंत लाईट पण आली होती. सगळ्यांच जेवून झालं होतं. गेल्या गेल्या घरची विचारण्याच्या आधीच सोन्याने सांगून टाकलं की सगळीकडं बघितलं पण बाबा काय कुठंच सापडला नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पडले. म्हाताऱ्याला म्हातारीने थोरल्या मास्तराच्या घरी बघायला पाठवलं. सोन्या आणि सोन्याच्या बाबाला केलेली जेवणाची ताट थंड झाली होती. परत गरम करून सोन्याला आईने वाढले. पिंठ्याला झोपायला अंथरून म्हातारीने घालून देता देताच आपल्याशीच बोलल्यागत बोलली " कुठं जाऊन बसलासलं बापडा". थोड्या वेळातच तरणा आणि म्हातारा आला. ढोरासनी गवात टाकून म्हाताऱ्यानं गल्लीकडच्या दरवाजाला कडी लावून घेतली. तरण्याचं तो पर्यंत जेवून झालं होतं. पिंठ्या झोपेच्या अधीन झाला होता. सोन्या अंगावर वाकळ घेऊन असाच पडून राहिलेला. म्हातारी पण डोक्याला फडका बांधून झोपायच्या तयारीन होती. जेवून तरणा खाटवर बसला. बसल्या बसल्या पुडीतन तंबाखू काढून घेऊन पुडी म्हाताऱ्याकडं सरकली. डबीतनं अंगठ्याच्या नखान थोडासा चुना काढून मळू लागला. म्हाताऱ्यान हातात चुन्याची डबी घेत विचारलं " काय म्हणलता थोरला मास्तर". तरण्यांन मळलेला तंबाखू ओठाखाली दडपला आणि बोलू लागला " देसाई मळ्याच्या मालकाचा निरोप व्हता" . डेरीत दूध घालायला गेल्यावर घराकड येऊन जा असं बोलला होता".
म्हातारी " काय म्हणाला मास्तर ?"
 तरणा - "मास्तर म्हणत होता बाजारात देसाई गाठ पडलेला . म्हणत होता म्हण पहिला सारखं मळा कसंना झाल्यात. म्हणावं तसं उत्पन्न पण निघणा. दोन तीन जणांची शेती केल्यात त्यामुळं त्यासनी मळ्याकड म्हणावं तस लक्ष द्यायला होईना. बघा म्हणावं जमत असलं तर शेत करा नाहीतर शेत सोडून द्या " ते ऐकून सगळेच चक्रावले.


शेत सोडून द्या हे ऐकून क्षणभर सगळेच शांत बसले. म्हातारीनच परत तोंड फोडलं. " काय झालंय मालकाला.असं का म्हणतुया" काय पिकत व्हतं आधी शेतात..हाथ हातभार हारेटिच यायची. सगळं आता बरं झालंय तर आम्ही नको झालंय काय त्याला"
तरणा " गावात काय कमी हाइत कान भरवायला" राबून खातेल्याला खाऊ कुठं देत्यात"
आतापर्यत गप्प बसलेला म्हातारा म्हणाला " कानाकडं घास जात्यात काय मालकाचं दुसऱ्याच ऐकायला" ये आमच्या म्होरं आणि विचार आम्हांसनी जाब चुकला असलाव तर. मागं बी एकदा असंच करून बसलाय. शेत घ्यायचं हाय न्हवं ये आणि घे की . असं लोकाकडणं काय सांगतोय.
म्हाताऱ्याचं टक्कुरचं फिरलेलं . "एवढं राबून राबून मिळालं ते घरपोच पोचवलं तरी हेंच मन समाधानी न्हाई म्हणजे. नाहीतर हाइतच की एक एक जण करणारी शेत. गवताला पड पडत्यात. लावजा म्हणावं त्यासनी"
म्हाताऱ्यानं बोलता बोलता मालकाच्या आधीच निकाल लावलेला. भांडीकुंडी करून सोन्याची आईपण बसलेली.बोलावं की न बोलावं या पेचात ती बोलून गेली " आधी मालक काय म्हणतोय ते तरी बघा"
तरणा " मालकाला मास्तरन सांगून बघितलंय. तुला अशी माणसं मिळणार नाहीत पण तो हाय न्हवं शेजारचा बिब्बा. कल्लू जगदाळ्या तेचंच खर धरून बसलाय. म्हणावं तसं शेतकडं लक्ष दित नाहीत. त्यांचाकडन काढून घ्या मी करतो"
हे ऐकून म्हातारीचा तोल सुटला " त्या कल्ल्या भाड्याला काय जीव चाललाय" राबून खातेलं बघवना काय" एवढं राबायचं हाय तर स्वतःच्या शेतात उजेड पाड म्हणावं"
बराच वेळ याच्यावरच बोलणं झालं. सोन्या बी ऐकत ऐकत कव्वाच झोपला. म्हसरं भी पुढ्यातलं गवात संपल्यावर धडपडायला लागली.
म्हातारा खाटवर आडवं व्हईत म्हणाला
"झोपा आता , उद्या बघव्या" आणि काडसार टाक ढोरानच्या पुढ्यात"
सगळी झोपायला गेली.तरणा पण गवात टाकून हाथरुणावर आडवा झाला. पडल्या पडल्या परत तोच डोक्यात विचार आला. राग शेत काढून घेण्याबद्दलचा नव्हता. राग होता तो प्रामाणिकपणे राबून , फसवाफसवी न करता मिळेल ते शेतातील सोनं घरपोच करून सुद्धा त्याबद्दल शंका घेतली त्याबद्दलचा होता.
तरण्यांन तसच डोळं झाकलं आणि समोरच्या भिंतीवरची पाल चुकचुकली.
पहाटेच भगाटलं. रात्री उशिरा झोपल्यामुळं कुणालाच जाग आली न्हाई. म्हसरांच्या धडपडण्याने तरण्याला जाग आली . त्यानं बायकोला बी उठविलं . तीनं उठून चूल पेटवली आणि चहाला ठेवलं. तरण्यानं गडबडीने तोंडाला पाणी लावलं आणि धारंसाठी कॅन आणि तांब्या घेतला. इतक्यात चहा पण झाला होता. बायकोनं चहा पुढ्यात आणून ठेवला . चहा बशीत ओतून फराफर फुरके मारू लागला . चहा संपवून धारंला निघून गेला. त्याच्या पाठोपाठ सोन्याची आई भरड्याच्या बुट्ट्या घेऊन गेली. तरण्यानं दोन्ही म्हशींच्या पुढ्यात भरड्याच्या बुट्ट्या ठेवल्या आणि दोघे दोन्हीकडं धारंला बसले.
पाखरं राखायची धांदल उडालेली. म्हातारा बामनाच्या मळ्याकडं गेला आणि तरणा मान्याच्या शेताकडं . आणखी पंधरा दिसं तरी पाखरातनं सुटका नव्हती. देसाई मळ्याला अर्ध्याला उसाचं खोडवं आणि लावण होती. आता ऊस कधी जाईल तवा तिकडं जायला लागणार होतं.
पंधरा दिवस गेलं. दोन्ही शेताचा शाळू मळून झाला. पण देसाई मळ्याकडं तरणा फिरकला ना म्हातारा. त्यासनी तिकडं जायलाच वाटना. ही खबर मालकाला पोहचलेली व्हती . कारण मास्तर कडनं निरोप आलता की धा च्या गाडीनं मालक येणार हाय घरातचं थांबा. शेता शेजारचा कल्लू तर डोळा ठेवूनच असतोय त्यानंच ही गोष्ट बाजारला गेल्यावर मालकाच्या कानांवर घातली असणार.
सकाळी सकाळी दोघ दोन शेताकडं फेरफटका मारून आलं . घरात येऊन पोहचायला दहाच्या गाडीनं देसाई मालक पण आला. सगळी मधल्या सोप्याला बसलेली. मालकाला बसायला लाकडी खुर्ची दिली. म्हातारा खाटवर बसलेला, तरणा उभा होता. म्हातारी जेवण खोलीत सुनेला चहा ठेवायला सांगायला गेली. पोरं आधीच शाळेला गेलती. इकडचं तिकडचं बोलून झालं , चहा पण झाला. तरणा , म्हातारा , मालक अशी तंबाखूची पुडी फिरली. आता बोलायला काय नव्हते म्हणून थुंकायला म्हातारा बाहेर जाऊन आला. बोलायचं तर मालकाला व्हतं. मालक पण दोन एक मिनिटं तंबाखू मळलेला हात चोळत उठला आणि बाहेर थुंकून आला. बसता बसता म्हणाला "सगळ्यांच ऊस गेलं , बघा मळ्याची तोड आल्या काय"
तरणा - "सांगितलंय टेंडर ला पुढल्या वारात तोडणार हाइत"
मालक " तुम्ही तर आता शेताकडं फिरकत न्हाईसा अशानं ऊस कव्वा जायचा".
आता विषयाला तोंड फुटलेलं. तसा म्हातारा सावरून बसला आणि म्हणाला "आता मालकालाच पसंद न्हाई आम्ही राबतेलं तेला कोण काय करणार"
मालक - " श्यात तर तुम्हाला च लावलंय न्हवं"
म्हातारा - लावलंय की आणि आम्ही बी जीवापाड केलय बी. पण मालकचं कागाळ्या कराय लागला तर काय करायचं"
हे मात्र मालकाला झोंबले. मालकानं विचारलं " काय कागाळ्या केल्या"
आता तरणा मधी पडला "हेचं की दोन तीन शेत केल्यात , शेताकडं म्हणावं तसं लक्ष देईनात" बघा म्हणावं जमत असलं तर करा न्हाइतर सोडा"
हे ऐकून मालकाचं मन खट्टू झालं. आपली बाजू सावरायला मालक म्हणाला " मला तसं म्हणायचं नव्हतं. सोडा वैगरे. मी एवढंच बोललो की दोन तीन शेत हाइत इकडं दुर्लक्ष व्हायला नको"
आता सासवासुना पण मधल्या सोप्याला येऊन उभ्या राहिल्या. म्हातारी म्हणाली "तुम्ही सांगा काय दुरलक्ष केलय" आम्हाला सगळी शेतं सारखी' सगळीकडं तेवढंच राबणार."
म्हातारा " मागल्या वेळस बी तुम्ही असच बोलल्यासा . आम्हाला बी नाय बोलत . दुसऱ्याला बोलत्यासा. त्यावेळी बी बोललेलो आमच्या काय चुका असतील तर आम्हाला सांगा. एवढं प्रामाणिक राबून पण दुसऱ्या कडनं असं ऐकून काळजात भेग पडत्या"
म्हाताऱ्यानं विषय कंडका करायच्या वाटेला लावला. मालकाला त्याची चूक जाणवली पण आता उशीर झाला होता. मालक म्हणाला " जाऊ द्या झालेलं, बघा आता परत शेताकडं"
म्हातारा - "आता नाय जमणार"
मालकाला वाटले नव्हते की हे एवढं कडेला जाईल.
मालक - अहो असं काय करताय , एवढं कशाला ताणाल्यासा"
तरणा " ताणायचं काय त्यात , तुम्ही बोललाच आहेसा तसं. तुम्हाला शेत लावायचं हाय दुसऱ्याला"
मालक - "म्हणजे तुमचं आधीच ठरलंय"
म्हातारा - " कुणाला हौस हाय मालक पण काय करणार . काय व्हईल तो हिसाब दया आणि ऊस गेल्यावर तुमचं शेत तुमच्या ताब्यात घ्या"
बोलायला काय आता उरले नव्हते.मालकाने चप्पल चढविले आणि वाटेला लागला. घरचे सगळं आटपून शेताला गेले. समोरासमोर संवाद न झाल्याने इतके वर्षाचा राबता मोडला.
समाप्त



Thursday, June 23, 2011

सात समुद्र ओलांडून ! --- आकाशानंद


‘मराठी’ हा शब्द उच्चारताच आपल्या दृष्टीपुढे कितीबरी गोष्टी उभ्या राहतात! महाराष्ट्र भूमी, मराठी माणसं, मराठी माणसाची मराठी मन, मराठी माणसाची संस्कृती, संत कवी, लेखक, नाटककार, अभिनेते, क्रिकेटपटू, चित्रकार, कुस्तीवीर, मराठी मातेच्या कीर्तीमान सुकन्या. पण आज आपण केवळ ‘मराठी’ भाषेचाच-ओजस्वी भाषेचा विचार केलातरी अभ्यास संशोधनानंतर कळतं की, अनेक विचारवंतांनी आपल्याला मराठी भाषेला आपल्या मनातील विचारसौंदर्य बहाल केलं आहे. आद्य कवी मुकुंदराज, आद्य नाटककार विष्णुदास भावे, आद्य कांदबरीकार बाबा पद्मनजी, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत अशी नुसती ‘आद्याची’ नामावली सुद्धा दहा पृष्ठांची होऊ शकेल.

एक गोष्ट मात्र खरी मराठी माणसाने मराठी भाषेवर नितांत अकृत्रिम प्रेम करावे. सानेगुरुजी म्हणतात की, संत ज्ञानेश्वरांनी ‘स्त्री शुद्ध प्रतिभेत सामावले ’ असा विचार ज्ञानेश्वरीत प्रगट करुन मराठी माणसाचा मोठेपणाच सिद्ध केला आहे. या मराठी माणसाला ‘ज्ञानाच्या भाकरी सोबत विचारांचा ठेवाही लागतो’ असंही साने गुरुजी पुढे म्हणतात. मराठीतला सर्व श्रेष्ठ विचार कोणता? तर डॉ. अरुण टिकेकर म्हणतात, ‘संत ज्ञानेश्वरांची अजरामर रचना म्हणजे ‘पसाय-दान’ हा मराठीचा बहुमोल ठेवा आहे. तो जतन करायलाच हवा.’ ते म्हणतात, ‘सर्व जगात बिनतोड असा हा विचार आहे. पसायनदाना सारखा विचार जागतिक वाड्‍ःमयात क्वचित कोठे आढळेल, पसायनदानातील विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला जगात कोठे ही तोड नसेल!’ साने गुरुजींनी तरी ‘समस्ता बंधू मानावे कारण प्रभुची लेकरे सारी’ असंच नाही का म्हटल? पण या समस्तामध्ये जनी जनार्दन शोधण्याची प्रक्रियाही अंतर्भूत होते असं छत्रपती शाहू महाराजाचं म्हणणं आहे ‘मराठीचा धर्म कोणता?
देशबंधूंची सेवा करणे,
जनी जनार्दन शोधणे,
आणि जनी जनार्दन पाहणे!‘

गोपाळ गणेश आगरकर तरी दुसरं काय म्हणतात? त्यांच्या मते रामदासांनी आपल्याला दिलेली शिकवण ‘शहाणे करुन सोडावे सकळजन’ ही अत्यंत महत्वाची आहे. ‘देश समर्थ, शक्तिशाली व्हावा म्हणून, लोकांची मने कार्य प्रवण व्हावीत म्हणून सर्वांनी स्वीकारावे एकमेव ब्रीद ‘शहाणे करुन सोडावे सकळ जन! केवळ ज्ञानेश्वर, रामदासांनीच नव्हे तर सगळ्याच मराठी संतांनी असाच संदेश दिला आहे. जीवनरहस्यकार विमलाताई ठकार म्हणतात - ‘संतांनी महत्त्व सांगितले, निर्हेतुकाची कला शिकविली, निरागस अवधानाची, समर्पण वृत्ती, कोमलता, सहजता, शालीनता अंगी बाळ्गून शिकवण दिली माणुसकीची! पण आम्ही काय करतो? संत काव्य फक्त वाचतो. त्यांची शिकवण स्वतःच्या अंगी बाणवायची आहे हे विसरतो?" अशी तक्रार आहे - ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांची - ‘संत साहित्य नुसते वाचू नका. ते प्रत्यक्ष कृतीत आणा, संतांची आज्ञा पाळणे हाच असावा मराठी माणसाचा बाणा!’

त्यांनी ‘मनाचे श्लोक’ हे रामदासास्वामींच्या अजोड साहित्यानिर्मितीच प्रतीक आहे असं म्हटलं आहे.

‘मनाचा प्रत्येक श्लोक
प्रमार्थाने भरलेला आहे,
रामदासांनी तो लिहून
आम्हाला उपकृत केलेल आहे?

डॉ. आंबेडकरांच तर ग्रंथावर खूप प्रेम, त्यांचं संपूर्ण ‘राजगृह’ म्हणजे ग्रंथालय, त्यांना ग्रंथ आपले ‘स्नेही सोबती’ वाटत. मराठी म्हणजे माय माऊली - अगदी पोटाशी धरणारी वाटत असे. ‘समाजाने मला बहिष्कृत केले, थोर ग्रंथानी मला पोटाशी घेतले! त्यांच्या सारखा जगात स्नेही नाही, मातेसारखे मार्गदर्शन यांनीच केले! तर लोकमान्य टिळ्कांन ‘ग्रंथ हेच गुरु’ वाटत. ते म्हणत, ‘मी चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर त्यापुढे स्वर्गप्राप्ती सुद्धा तुच्छ आहे. मी चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर स्वर्गाचे सुख चालून आले तरी नाकारीन, कारण चांगले ग्रंथ ज्या जागी असतात - तेथे ते प्रत्यक्ष स्वर्गच निर्माण करतात!’
टिळकांच्या मनात मायमराठी बद्दल नितांत श्रद्धा. मराठी जनता म्हणजे कल्पवृक्ष प्रत्यक्ष कामधेनूच! "मला राष्ट्रजागृतीसाठी पैसा’ लागला, निकड जनतेला कळली आणि ‘तो’ मायमराठीने दिला नाही, माझी झोळी भरली नाही असे कधी झाले नाही. मराठी जनता कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. मला कधीच कमी पडू दिलं नाही."

मराठी लेखकांनी ‘मराठी माणूस’ हा आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू मानून लिखाण करावं असं वि.स. खांडेकर म्हणतात. ‘माणूस हा साहित्याचा केंद्र बिंदू असावा, मानवता हीच मराठी लेखकाची जात आहे. जीवनात जे जे चांगले होते ते ते त्याने स्वीकारावे. मी केवळ जीवनवादी नसून संस्कारवादी आहे! मराठी लेखकानंकेवल कलात्मक, जीवनवादी लिहून भागत नाही तर त्यांने संस्कारवादीही असावं आणि मी तसाच आहे!’ असं विधान भाऊसाहेबांनी केलं आहे.

संत गाडगेबाबा स्वतः निरक्षर होते पण प्रत्येक ‘मुलांनं शिकलं पाहिजे’ हा त्यांचा आग्रह दरवेळी ते आपल्या रसाळ कीर्तनातून करीत. ‘माणसाणे एक सांजचे उपाशी रहावे, बाईने लुगडे फाडून त्याचे दान करावे, पण आपल्या पोराले अज्ञानी ठेवू नये, त्याने मराठी शाळेमंदी शिकाले पाठवावं!‘ आपल्या मातृभाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असावा आपली मातृभाषा म्हणजे मराठी ती तर आपली आईच. साने गुरुजी म्हणतात - ‘आपल्या मातृभाषेबद्दल मराठी माणसाला अभिमान नाही, पाऊणपट मुले महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात, देश महाभयंकर संकट काळात त्यामुळे सापडला आहे. दारिद्र्याच्या खाईत आपले लोक गटांगळ्या खात आहेत!’

आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई, धर्म आपली माता. आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी, प्रसादपूर्ण , सहजबोध आहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात, ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते. तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी वोलताना फजिती होईन!

दुर्गाबाई भागवत म्हणतात, कोणत्याही गोष्टीत मग, ती मराठी भाषा का असेना, प्रभुत्त्व मिळवायचं असेल तर ‘वाया जाऊ नेदी क्षण’ हा विचार मोलाचा आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात ‘आमचा कवी कोणत्याही ‘वर्गाचा’ नसतो. तो फक्त माणसाचे गाणे गात अस्तो! मुलाना वाचनाची गोडी आज अजिबात राहिलेलेई नाही अशी खंत प्रकाशभाई मोहाडीकर, साने गुरुजी कथामालेतून व्यक्त करतात. ‘बालवाड्‍ःमयाच्या प्रसारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी. मुलांना मराठी शिकवून वाचनाची गोडी त्यांना लावावी.’ यदुनाथ थत्ते म्हणतात, ‘बालकुमार युवकांच्या वाचनाला फार महत्त्व आहे’ तर मधु दंडवते म्हणतात, ‘सानेगुरुजींच्या साहित्याला मराठीत फार मान आहे. काही पुस्तकांचे इंग्रजी अनुवादही झाले आहेत. पण मुळ मराठीत असलेल्या पुस्तकांचा अनुवाद आपण एकदा वाचून तरी पहावा असं इंग्रजी वाचकाला वाटतच नाही! विष्णुशास्त्री चिपळूणकर लेखकाच्या स्फूर्तीबद्दल म्हणतात, ‘अंतःकरणाला पीळ पाडणारे घडले म्हणजे लेखणीने लिहायला सुरुवात केलीच पाहिजे!’

ही मराठी माणसाच अंतरंग व्यक्त करणारी मोलाची गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षिका झाल्यानंतर आपल्या महिला विद्यार्थिनीला एकच मोलाच संदेश दिला. ‘भागिनीनो, तुम्ही एकदा का, मराठी लिहायला वाचायला शिकलात तर भाविष्यकाळातलं यश पडेल नक्कीच तुमच्या पदरात!’

आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून केवळ मराठीसाठीच नव्हे तर सर्व भारतीय भाषांकरिता उपयोग करावा असा आग्रह धरला आहे. भाषाकोषकार विश्वनाथ नरवणे यांचंही म्हणणं हेच आहे. विनोबा म्हणतात, ‘मराठीच्या लेखकांनी इतर भाषेतील बोधप्रद साहित्य अनुवादित करुन मराठी वाचकांना द्यावे. मराठीचे अवांतर वाचन मुलांनी केल नाही तर त्यांना पुढे फार पश्चात्ताप होईल!’ असाही निष्कर्ष ते काढतात. म. गांधी मातृभाषा हीच शिक्षणाचम माध्यम म्हणून वापरली तर आपण स्वदेशीचा अंगिकार केला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल असे सांगतात .

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या सार्थ उक्तीनं या लेखनाचा समारोप करु या -

 

‘मराठीची चिंता करण्याची गरज नाही, ग्रामीण भागात ती जागवली जात आहे, शाहीर आणि संत कवींनी हातभार लावला आहे. सात समुद्र ओलांडून

प्रेमाचा ज्वर

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!
भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!
तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!
"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरीथांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."
ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"
बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!
कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!
अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

Pravin Nikam

Sunday, May 30, 2010

प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.

                            ''जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
                             भयाण खिंडी बसल्या पसरुनि 'आ' रानमोळी''

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.

अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

असं म्हणतात की, १६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.
प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. ''होता जिवा म्हणून वाचला शिवा'' या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा
http://www.pratapgad.in/marathi/index_marathi.php

Saturday, May 29, 2010

किल्ले कमलगड

वाई हा सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. इतिहासकाळापासून प्रसिद्ध असलेल्या वाई तालुक्यामधे सहा किल्ले आहेत. कृष्णेचा काठ लाभलेल्या वाईच्या पश्चिमेला कमळगड नावाचा लहानसा पण समुद्रसपाटीपासून १३७५ मी. उंचीचा किल्ला आहे.

वाई गाव हे पुणे तसेच सातारा शहरापासून गाडीमार्गाने जोडले गेले आहे. पुणे बेंगळुरु मार्गाच्या पश्चिमेला १० कि.मी. अंतरावर वाई आहे. वाई मधूनच पाचगणी आणि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीमार्ग आहे.

वाईच्या पश्चिमेला धोम धरण आहे. धोम धरण कृष्णा आणि वाळकी नद्याच्या संगमावर बांधले आहे. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. या फुगवट्याने कमलगडाला तिन बाजुने विळखा घातला आहे. त्यामुळे कमळगडाला जाण्यासाठी लांबचा वळसा घेवून जावे लागते.

कमळगडाला उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडूनही जाता येते. वाई मधून जोर या गावाला जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावर वयंगाव नावाच्या गावात उतरुन कृष्णा ओलांडून कमळगड गाठता येतो. पण अधिक सोयीचा मार्ग म्हणजे धोम धरणाच्या दक्षिण तीरावरुन जाणारा मार्ग. या मार्गाने मेणवली, खावलीकडून वासोळे गावाला पोहचणे. वासोळे पर्यंत गाडी मार्ग असून एस. टी. ची सेवा ही उपलब्ध आहे.

वाईच्या या पश्चिम भागात सह्याद्रीच्या तीन उपरांगा आहेत. महाबळेश्वर, कोल्हेश्वर आणि रायरेश्वर अशा नावानी या रांगा ओळखल्या जातात.

कोल्हेश्वराच्या दक्षिणेकडे महाबळेश्वर रांग बसून उत्तरेकडे रायरेश्वराची डोंगररांग आहे. कोल्हेश्वराच्या पूर्व टोकाजवळ कमलगडाचा किल्ला आहे. पायथ्याच्या वासोळे गावातून कमलगडाचा पायी मार्ग आहे. मार्गावर पाणी नाही त्यामुळे खालूनच पाणी भरुन घेणे गरजेचे आहे. या मार्गावरचा चढ हा छातीवरचा असल्यामुळे वरच्या पठारावर पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. तासा दिड तासात आपण पठारावर येवून पोहोचतो. येथून डावीकडे कमलगड आहे. डावीकडे वळाल्यावर झाडीचा पट्टा सुरु होतो. येथील एका वहाळाला स्वच्छ पाणी असते.

या झाडीतून आपण पठारावरील धनगराच्या झापाजवळ पोहोचतो. झापाजवळ झाडी तोडून येथे शेती केलेली आहे. झापाच्या मागे काहीशा उंचीचा कमलगडाचा माथा उठावलेला दिसतो. माथ्याच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. माथा उजवीकडे ठेवून वळसा मारल्यावर घळीतून चढून गडावर पोहचता येते.

माथा उघडा बोडका असल्यामुळे आजुबाजूचा सह्याद्री आपल्यासमोर नव्या रुपात उभा ठाकलेला दिसतो. कमलगडावर ऐतिहासिक वास्तूंचा अभावच आहे. पण येथील विहीर मात्र प्रसिद्ध आहे. हिला कावेची विहीर म्हणतात. खोल असलेल्या विहीरीमध्ये उतरण्यासाठी पायर्‍या आहेत.

कमलगडावरुन चंदन, वंदन, नांदगिरी, वैराटगड, पांडवगड, केंजळगड तसेच पाचगणी, महाबळेश्वर आणि रायरेश्वरचे पठार उत्तम दिसते. धोमचा जलाशय आणि वाई परिसरही नजरेत येतो.

सह्याद्रीचे देखणे रुप मनात साठवूनच आपण परतीच्या प्रवासाला निघतो ते सह्याद्रीला एक सलाम करुनच.



  • प्रमोद  मांडे