Monday, February 5, 2018

शेतवडी




          संध्याकाळ सातचा सुमार. बाहेर सगळं अंधारलेलं. गल्लीकडचा दरवाजा थोडा पुढं केला होता. पुढच्या सोप्यात गोठा होता. एका बाजूला म्हैशी आणि दुसऱ्या बाजूला बैलजोडी. बसतो म्हटलास तर बसायला जागा नव्हती. बैलांच्या पुढ्यात भरड्याच्या बुट्ट्या ठेवलेल्या होत्या आणि ती आपली मुंडी डोलवत त्यात गुतलेली. म्हैशींच्या पुढ्यात चगाळ टाकलेलं. ते काय त्यासनी गॉड लागलाय असं दिसतं नव्हतं.दोघी एकमेकींना शिंगाण डांगलत उभ्या होत्या. एक बारकं रेडकू गाडीच्या कण्याला बांधलेलं.. ते आपलं जोरात ताकत लावून कन्ना ओढून आपल्या आईकडं जायला बघत होतं.
मधल्या खोलीत एका जुनाट रेडिओचा खरखरत आवाज चालू होता. नक्कीच त्या सांगली केंद्रावरून सातच्या बातम्या चालू होत्या. म्हातारा खाटवर आड्याकड बघत पडलेला. कानावर पडणाऱ्या बातम्या ऐकत. खोलीत 40 चा बल्ब लावलेला. उजेड असून सुद्धा डिंम दिसत व्हतं.. पिंठ्या पुस्तक आणि वहीवर डब पडून अभ्यास करत होतं. त्याच अर्ध लक्ष अभ्यासात अर्ध रेडिओकडं. धूर बाहेर जाऊ दे म्हणून आईनं परड्याकडचा दरवाजा उघडला तर घरात कीडं यायला लागलं म्हणून पिंठ्यानं तो बंद केला. त्यातनं त्याला आई म्हणालीचं "अरं घुसमटल्यावणी व्हालय राहू दे की थोडा वेळ". पिंठ्या कुरकुरत म्हणाला "सगळं कीडं आत याल्यात आणि लाईटभवती फिरल्यात.. पुस्तकावरणं पडल्यात.. पिंठ्याच्या ध्यानीमनी ही नव्हतं धुरामुळं आईला किती त्रास होतोय ते. म्हातारीची देव घरात पूजा चालली होती. घरचा तरणा तेवढा घरात नव्हता. घरात सगळी असून सुद्धा माणसांचा उल्लंव नव्हता.
        इतक्यात लाईट गेली. लाईटीचा हा खेळ नेहमीचाच झालेला. सगळीकडं काळोखच दिसू लागला . देव घरातून थोडा उजेड जाणवत होता. पिंठ्याने मोठ्याने ओरडून आईला दिवा लावायला सांगितलं. वरच्या दिवळीतली चिमणी त्यानं सास्पून घेतली आणि हळूहळू पाय ओढत सरकू लागला. इतक्यात जेवण खोलीतून आई दिवा घेऊन आली. "ही घे चिमणी , गल्लीकडच्या सोफ्यात ठेव जा " . गल्लीकडच्या सोफ्यात दिवा ठेवून पिंठ्या परत अभ्यासाला लागला. म्हातारा लाईट गेली तशी उठून बसला. म्हातारी बी पूजा आटपून मधल्या सोफ्यात भुईला बसली. पिंठयाच आता अभ्यासात लक्ष नव्हतं. दिव्याभोवती फिरणाऱ्या किड्यांना पकडून तो जाळत बसला होता. म्हातारा ते बघून म्हणला बी " गप बस की कशाला चिमणीला कीडं जाळत बसलास". पण पिंठयाच काय तिकडं लक्ष नव्हतं. पिंठ्याच्या आईचं जेवण आटपलं तसं ती ही मधल्या उंबऱ्याला लागून भाजी नीट करत बसली. इतक्यात बाहेरून टीव्ही बघायला गेलेला सोन्या पण आला. घरात येताना त्यानं अंदाज घेतला बाप आहे की नाही. नसल्याची खात्री झाली तसं तो एकदम तऱ्हाट घुसला.


      बराच वेळ झाला , इकडच्या तिकडच्या गोष्टी पण संपल्या. चिमणीतलं तेल पण संपायला आलं पण तरण्याचा अजून काही पत्ता नव्हता. म्हाताऱ्यानं परत पाठ टेकलेली , जोरात तीन चार जांभया दिल्या. सोन्याला आईनं बाबाला बोलवायला पाठीवलं. जाता जाता पेंगुळलेल्या पिंठ्याला टपली मारून सोन्या बाहेर पळाला. सासवा-सुना जेवण खोलीत ताटं करायला गेल्या. इकडं सोन्या कुंभाराच्या कट्टीला जाऊन आला तरी काय बाबा दिसला नाही. पाटलाचा वाडा झाला, मोऱ्यांच्या मांडवात बघितलं बाबाचा काही पत्ता नाही. बराच वेळ झाला होता. अक्खी गल्ली पालथी घातली , पुढच्या गल्लीतल्या रहदारीच्या घरी पण जाऊन आला. सोन्याचा इकडं जीव भुकेने व्याकुळ झाला होता. सगळीकडं सामसूम झाली होती. सोन्या घराकडं निघाला. वाटत कुप्याचा आप्पा भेटला. तो झोपायच्या तयारीला लागलेला . झोपायच्या आधी ढोऱ्हासनी गवताचं बघत होता . सोन्याला बघून म्हणाला "काय रं जेवलास काय? सोन्याला काय सांगावं सुचलंच नाही. तो "हो" बोलला आणि घराकडं निघून आला.
आता पर्यंत लाईट पण आली होती. सगळ्यांच जेवून झालं होतं. गेल्या गेल्या घरची विचारण्याच्या आधीच सोन्याने सांगून टाकलं की सगळीकडं बघितलं पण बाबा काय कुठंच सापडला नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पडले. म्हाताऱ्याला म्हातारीने थोरल्या मास्तराच्या घरी बघायला पाठवलं. सोन्या आणि सोन्याच्या बाबाला केलेली जेवणाची ताट थंड झाली होती. परत गरम करून सोन्याला आईने वाढले. पिंठ्याला झोपायला अंथरून म्हातारीने घालून देता देताच आपल्याशीच बोलल्यागत बोलली " कुठं जाऊन बसलासलं बापडा". थोड्या वेळातच तरणा आणि म्हातारा आला. ढोरासनी गवात टाकून म्हाताऱ्यानं गल्लीकडच्या दरवाजाला कडी लावून घेतली. तरण्याचं तो पर्यंत जेवून झालं होतं. पिंठ्या झोपेच्या अधीन झाला होता. सोन्या अंगावर वाकळ घेऊन असाच पडून राहिलेला. म्हातारी पण डोक्याला फडका बांधून झोपायच्या तयारीन होती. जेवून तरणा खाटवर बसला. बसल्या बसल्या पुडीतन तंबाखू काढून घेऊन पुडी म्हाताऱ्याकडं सरकली. डबीतनं अंगठ्याच्या नखान थोडासा चुना काढून मळू लागला. म्हाताऱ्यान हातात चुन्याची डबी घेत विचारलं " काय म्हणलता थोरला मास्तर". तरण्यांन मळलेला तंबाखू ओठाखाली दडपला आणि बोलू लागला " देसाई मळ्याच्या मालकाचा निरोप व्हता" . डेरीत दूध घालायला गेल्यावर घराकड येऊन जा असं बोलला होता".
म्हातारी " काय म्हणाला मास्तर ?"
 तरणा - "मास्तर म्हणत होता बाजारात देसाई गाठ पडलेला . म्हणत होता म्हण पहिला सारखं मळा कसंना झाल्यात. म्हणावं तसं उत्पन्न पण निघणा. दोन तीन जणांची शेती केल्यात त्यामुळं त्यासनी मळ्याकड म्हणावं तस लक्ष द्यायला होईना. बघा म्हणावं जमत असलं तर शेत करा नाहीतर शेत सोडून द्या " ते ऐकून सगळेच चक्रावले.


शेत सोडून द्या हे ऐकून क्षणभर सगळेच शांत बसले. म्हातारीनच परत तोंड फोडलं. " काय झालंय मालकाला.असं का म्हणतुया" काय पिकत व्हतं आधी शेतात..हाथ हातभार हारेटिच यायची. सगळं आता बरं झालंय तर आम्ही नको झालंय काय त्याला"
तरणा " गावात काय कमी हाइत कान भरवायला" राबून खातेल्याला खाऊ कुठं देत्यात"
आतापर्यत गप्प बसलेला म्हातारा म्हणाला " कानाकडं घास जात्यात काय मालकाचं दुसऱ्याच ऐकायला" ये आमच्या म्होरं आणि विचार आम्हांसनी जाब चुकला असलाव तर. मागं बी एकदा असंच करून बसलाय. शेत घ्यायचं हाय न्हवं ये आणि घे की . असं लोकाकडणं काय सांगतोय.
म्हाताऱ्याचं टक्कुरचं फिरलेलं . "एवढं राबून राबून मिळालं ते घरपोच पोचवलं तरी हेंच मन समाधानी न्हाई म्हणजे. नाहीतर हाइतच की एक एक जण करणारी शेत. गवताला पड पडत्यात. लावजा म्हणावं त्यासनी"
म्हाताऱ्यानं बोलता बोलता मालकाच्या आधीच निकाल लावलेला. भांडीकुंडी करून सोन्याची आईपण बसलेली.बोलावं की न बोलावं या पेचात ती बोलून गेली " आधी मालक काय म्हणतोय ते तरी बघा"
तरणा " मालकाला मास्तरन सांगून बघितलंय. तुला अशी माणसं मिळणार नाहीत पण तो हाय न्हवं शेजारचा बिब्बा. कल्लू जगदाळ्या तेचंच खर धरून बसलाय. म्हणावं तसं शेतकडं लक्ष दित नाहीत. त्यांचाकडन काढून घ्या मी करतो"
हे ऐकून म्हातारीचा तोल सुटला " त्या कल्ल्या भाड्याला काय जीव चाललाय" राबून खातेलं बघवना काय" एवढं राबायचं हाय तर स्वतःच्या शेतात उजेड पाड म्हणावं"
बराच वेळ याच्यावरच बोलणं झालं. सोन्या बी ऐकत ऐकत कव्वाच झोपला. म्हसरं भी पुढ्यातलं गवात संपल्यावर धडपडायला लागली.
म्हातारा खाटवर आडवं व्हईत म्हणाला
"झोपा आता , उद्या बघव्या" आणि काडसार टाक ढोरानच्या पुढ्यात"
सगळी झोपायला गेली.तरणा पण गवात टाकून हाथरुणावर आडवा झाला. पडल्या पडल्या परत तोच डोक्यात विचार आला. राग शेत काढून घेण्याबद्दलचा नव्हता. राग होता तो प्रामाणिकपणे राबून , फसवाफसवी न करता मिळेल ते शेतातील सोनं घरपोच करून सुद्धा त्याबद्दल शंका घेतली त्याबद्दलचा होता.
तरण्यांन तसच डोळं झाकलं आणि समोरच्या भिंतीवरची पाल चुकचुकली.
पहाटेच भगाटलं. रात्री उशिरा झोपल्यामुळं कुणालाच जाग आली न्हाई. म्हसरांच्या धडपडण्याने तरण्याला जाग आली . त्यानं बायकोला बी उठविलं . तीनं उठून चूल पेटवली आणि चहाला ठेवलं. तरण्यानं गडबडीने तोंडाला पाणी लावलं आणि धारंसाठी कॅन आणि तांब्या घेतला. इतक्यात चहा पण झाला होता. बायकोनं चहा पुढ्यात आणून ठेवला . चहा बशीत ओतून फराफर फुरके मारू लागला . चहा संपवून धारंला निघून गेला. त्याच्या पाठोपाठ सोन्याची आई भरड्याच्या बुट्ट्या घेऊन गेली. तरण्यानं दोन्ही म्हशींच्या पुढ्यात भरड्याच्या बुट्ट्या ठेवल्या आणि दोघे दोन्हीकडं धारंला बसले.
पाखरं राखायची धांदल उडालेली. म्हातारा बामनाच्या मळ्याकडं गेला आणि तरणा मान्याच्या शेताकडं . आणखी पंधरा दिसं तरी पाखरातनं सुटका नव्हती. देसाई मळ्याला अर्ध्याला उसाचं खोडवं आणि लावण होती. आता ऊस कधी जाईल तवा तिकडं जायला लागणार होतं.
पंधरा दिवस गेलं. दोन्ही शेताचा शाळू मळून झाला. पण देसाई मळ्याकडं तरणा फिरकला ना म्हातारा. त्यासनी तिकडं जायलाच वाटना. ही खबर मालकाला पोहचलेली व्हती . कारण मास्तर कडनं निरोप आलता की धा च्या गाडीनं मालक येणार हाय घरातचं थांबा. शेता शेजारचा कल्लू तर डोळा ठेवूनच असतोय त्यानंच ही गोष्ट बाजारला गेल्यावर मालकाच्या कानांवर घातली असणार.
सकाळी सकाळी दोघ दोन शेताकडं फेरफटका मारून आलं . घरात येऊन पोहचायला दहाच्या गाडीनं देसाई मालक पण आला. सगळी मधल्या सोप्याला बसलेली. मालकाला बसायला लाकडी खुर्ची दिली. म्हातारा खाटवर बसलेला, तरणा उभा होता. म्हातारी जेवण खोलीत सुनेला चहा ठेवायला सांगायला गेली. पोरं आधीच शाळेला गेलती. इकडचं तिकडचं बोलून झालं , चहा पण झाला. तरणा , म्हातारा , मालक अशी तंबाखूची पुडी फिरली. आता बोलायला काय नव्हते म्हणून थुंकायला म्हातारा बाहेर जाऊन आला. बोलायचं तर मालकाला व्हतं. मालक पण दोन एक मिनिटं तंबाखू मळलेला हात चोळत उठला आणि बाहेर थुंकून आला. बसता बसता म्हणाला "सगळ्यांच ऊस गेलं , बघा मळ्याची तोड आल्या काय"
तरणा - "सांगितलंय टेंडर ला पुढल्या वारात तोडणार हाइत"
मालक " तुम्ही तर आता शेताकडं फिरकत न्हाईसा अशानं ऊस कव्वा जायचा".
आता विषयाला तोंड फुटलेलं. तसा म्हातारा सावरून बसला आणि म्हणाला "आता मालकालाच पसंद न्हाई आम्ही राबतेलं तेला कोण काय करणार"
मालक - " श्यात तर तुम्हाला च लावलंय न्हवं"
म्हातारा - लावलंय की आणि आम्ही बी जीवापाड केलय बी. पण मालकचं कागाळ्या कराय लागला तर काय करायचं"
हे मात्र मालकाला झोंबले. मालकानं विचारलं " काय कागाळ्या केल्या"
आता तरणा मधी पडला "हेचं की दोन तीन शेत केल्यात , शेताकडं म्हणावं तसं लक्ष देईनात" बघा म्हणावं जमत असलं तर करा न्हाइतर सोडा"
हे ऐकून मालकाचं मन खट्टू झालं. आपली बाजू सावरायला मालक म्हणाला " मला तसं म्हणायचं नव्हतं. सोडा वैगरे. मी एवढंच बोललो की दोन तीन शेत हाइत इकडं दुर्लक्ष व्हायला नको"
आता सासवासुना पण मधल्या सोप्याला येऊन उभ्या राहिल्या. म्हातारी म्हणाली "तुम्ही सांगा काय दुरलक्ष केलय" आम्हाला सगळी शेतं सारखी' सगळीकडं तेवढंच राबणार."
म्हातारा " मागल्या वेळस बी तुम्ही असच बोलल्यासा . आम्हाला बी नाय बोलत . दुसऱ्याला बोलत्यासा. त्यावेळी बी बोललेलो आमच्या काय चुका असतील तर आम्हाला सांगा. एवढं प्रामाणिक राबून पण दुसऱ्या कडनं असं ऐकून काळजात भेग पडत्या"
म्हाताऱ्यानं विषय कंडका करायच्या वाटेला लावला. मालकाला त्याची चूक जाणवली पण आता उशीर झाला होता. मालक म्हणाला " जाऊ द्या झालेलं, बघा आता परत शेताकडं"
म्हातारा - "आता नाय जमणार"
मालकाला वाटले नव्हते की हे एवढं कडेला जाईल.
मालक - अहो असं काय करताय , एवढं कशाला ताणाल्यासा"
तरणा " ताणायचं काय त्यात , तुम्ही बोललाच आहेसा तसं. तुम्हाला शेत लावायचं हाय दुसऱ्याला"
मालक - "म्हणजे तुमचं आधीच ठरलंय"
म्हातारा - " कुणाला हौस हाय मालक पण काय करणार . काय व्हईल तो हिसाब दया आणि ऊस गेल्यावर तुमचं शेत तुमच्या ताब्यात घ्या"
बोलायला काय आता उरले नव्हते.मालकाने चप्पल चढविले आणि वाटेला लागला. घरचे सगळं आटपून शेताला गेले. समोरासमोर संवाद न झाल्याने इतके वर्षाचा राबता मोडला.
समाप्त



No comments:

Post a Comment