कवडा
दिवाळीची सुट्टी चालू होती. वैभव शाळेच्या सुट्टीचा आनंद घेत होता. बाकी मुले खेळण्यात दंग असायची पण वैभवचं काही वेगळच चालायचं. त्याला खेळण्यापेक्षा रानात फिरायला आवडायचे. कधी एकटा तर कधी मित्रांसोबत. गुडघा गुडघा गवतातून पण बिनधास्त घुसायचा. यासाठी आई सोबत असली तर आईकडून तो शिव्या पण खायचा. अंगाने तसा किडमीडा , गोल सावळा चेहरा, भवऱ्याच्या तिथले डोक्यावरचे केस साळीन्द्रीच्या गणासारखे उभेच असायचे. पाणी लावून भांग पाडला तर ते तेवढया पुरते बसायचे पण थोड्या वेळाने परत उभारायचे त्यामुळे त्याला आपल्या केसांचा राग यायचा. त्याला इनशर्ट करायला आवडायचा नाही. तो भटकायला चालला की शर्टची खालची दोन बटणे काढून गाठ मारायचा आणि शर्टचे दोन्ही भाया वरपर्यंत फोल्ड करायचा. घरी एकदा मार खाल्ल्याने घरात साधा सरळ असायचा.
पक्षीतज्ञ सलीम अली यांच्यावरचा शाळेतील धडा वाचल्यापासून वैभवचे फिरणे तसे वाढले होते. त्याला तेच तेच आठवत राहायचे . सलीम अली याना लहान वयात बक्षीस मिळालेल्या छर्याच्या बंदुकीने पक्षी टिपण्याचा छंद लागला. एकदा त्यांनी टिपलेल्या चिमणीच्या गळ्यापाशी त्यांना पिवळा ठिपका आढळला. नेहमीच्या चिमणीपेक्षा ही चिमणी काहीतरी वेगळी भासल्याने त्यांची उत्सुकता चाळवली गेली. त्याबद्दल उत्सुकता वाढली आणि पुढे त्यांचे मन त्याच्यातच रमले. सुरुवातीला गळ्यावर ठिपका असणारी चिमणी आपण पण शोधायची असे वैभवने ठरवले पण यात त्याला काही यश नाही आले. पण रानावनात फिरताना मोर, पोपट, कबुतरे, चिमणी ,साळुंखी असे वेगवेगळे पक्षी पहायला मिळायचे . कधी कधी हा घरट्या जाऊन किंवा ढोलीत हात घालून त्यांची अंडी मिळतात का पाहायचा . एकदा - दोनदा तर कावळ्याने याला टोचले होते. त्याचा सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे पिल्लांना पक्षीण घास भरवतेले पाहत बसणे. कधी कधी ती पिल्ले उचलून घरी घेऊन जावी असे त्याला वाटायचे. त्याला सगळ्यात जास्त आवडायचा तो पक्षी म्हणजे कवडा. त्याचे कारण पण तसेच होते. त्याला एकदा शेजारच्या काकांनी कवडयाविषयी पेपरात आलेले एक कात्रण दिले होते आणि त्यातून त्याला एक खास गोष्ट समजली होती. कवड्यांची आपल्या पिल्लांना अन्न भरवायची एक खास सवय असते. इतर पक्षी आपल्या पिल्लांना अळ्या, किडे अथवा फळे आणून भरवतात. पण ह्या कवड्यांच्या नर मादी दोघांच्याही गळ्यात असलेल्या खास ग्रंथीमधे दूधासारखा द्राव यावेळी खास तयार होतो. त्यांची बारकी पिल्ले आई,बाबांच्या चोचीत चोच घालून हा द्राव पितात आणि मग त्यांची वाढ झपाट्याने होते.
कवडा पक्षी रानात वावरणारी कबुतराचीच एक जात. ती गावात ही आढळली जायची. कधी तारेवर बसलेली , रस्ताच्या कडेला किंवा घराच्या कौलावर. वैभवला मग नंतर कवड्याची घरटी शोधण्याचा छंद लागला . कुठे एखादा कवडा दिसला की तो एकदम सावध व्हायचा आणि कवडा जवळ पास कुठे घरट्यात जातो का पाहायचा. गवताच्या बीया किंवा इतर दाणे चोचीने टिपून तो उडून जायचा आणि वैभवची निराशा व्हायची. एरवी मित्रांसोबत असला तर जपून असायचा की त्यांना कळता कामा नये नाहीतर आपल्याला काही करता येणार नाही . सुट्टीच्या दिवशी एकदा सहजच तो शाळेकडे फिरत आला. तसे त्याचे मैदानात असलेल्या कवड्याच्या जोडीकडे लक्ष गेले. नक्कीच ती नर मादीची जोडी होती. तो हळू हळू कट्ट्याच्या आडाने पुढे पुढे सरकून एका खांभाच्या आडोश्याला थांबला. नर मादी दाणे टिपून घरट्याकडे परतली. त्यांचे घरटे व्हरांडयाच्या छताखाली होते . वैभवला कधी एकदा घरटे आणि अंडी पाहू झाले. कोणतरी जवळ येत असल्याची जाणीव झाली तसे नर मादी उडून गेले. वैभव मग हळू हळू खांबावर चढला. थोडेसे लटकून कवड्याचे घरटे आणि त्यातील ती दोन अंडी पाहू लागला. घरटे फारसे आकर्षक नव्हते पण ती दोन छोटी अंडी मस्तच वाटत होती. अंड्याना हात लावण्याचा मोह झाला पण त्याला कुणाचे तरी बोल लक्षात आले की एकदा का माणसाने अंड्याला शिवले की पक्षी परत त्या अंड्याला शिवत नाहीत. तो तसाच परत उतरला. बराच वेळ खांबाजवळ थांबला जेणेकरून परत नर मादी घरट्याकडे येईल पण ती जोडी काय परतली नाही. त्याच्या डोळ्यात आनंद चमकत होता. तो तसाच घरी परतला .
आता त्याचा रोजचा कार्यक्रम झाला. घरटे असलेल्या ठिकाणी एक चक्कर मारायचा. शाळा चालू असली की त्याला जवळून अंडी पाहता येत नव्हती पण तो दुरूनच कवडा अंड्यावर बसला आहे का नाही याची खात्री करायचा. एखाद्या वेळेस कधी संधी भेटली की हळूच खांबावर चढून अंडी पाहून घ्यायचा.
रविवारची सुट्टी होती. सकाळी सकाळी लवकरच तो शाळेकडे आला.नंतर खेळायला गर्दी झाली तर अंडी पाहायला मिळणार नाहीत. गडबडीने घरटे असलेल्या ठिकाणी आला. प्रथमतः आजूबाजूला पाहिले .कोणी नसल्याची खात्री झाल्यावर पटदिशी खांबावर उडी मारली आणि सरसर वर गेला. हळूच खापरी आणि आडव्या खांभाच्या सांधेत घुसला. जेणेकरून व्हरांड्याकडे पाहिले तर कोणाला समजणार नाही. आता तो अशा ठिकाणी आडवा होता की घरटे अगदी त्याच्या समोर होते. तो येण्या आधीच नर मादी दाणे टिपण्यास बाहेर गेलेली असावी. थोडासा पुढे झाला आणि त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. घरट्यात त्याला दोन कोवळी कोवळी पिल्ले दिसली. ज्यांचे अजून डोळे सुदधा उघडले नव्हते. ती आपली मान वर करून हालचाल करत होती. वैभव तर पिल्ले पाहून हरकून गेला. पाच एक मिनिटे तो तसाच अवघडून बसला. पिल्ले पाहण्यात गर्क झाला होता. पिल्लांची आई त्याना खाऊ घेऊन येईल आणि आपल्याला पाहून परत माघारी जाईल म्हणून तो खाली उतरला. आजूबाजूला पाहिले आणि घराच्या वाटेला लागला. आज तो भलताच खुश होता.
पंधरवडा गेला. पिल्ले थोडी मोठी झाली. हळूहळू पंख फुटू लागले. वैभव तर घरट्यावर पाळत ठेवून होता. वैभवच्या मनात पिल्लांविषयी आपुलकी निर्माण झाली होती. त्याना पाहण्यात त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळायची. त्या प्रेमापोटी , आपुलकी पोटी तो त्या पिल्लांना आपल्या घरी घेऊन जाणार होता. पण त्या बालमनाला हे माहित नव्हते की तो पिल्लांना आपल्या जन्मदात्री पासून वेगळे करणार होता. त्याचे आधीच ठरले होते की पिल्ले थोडी मोठी झाली की त्यांना घरी घेऊन जायचे. त्यासाठी त्याने आपल्या घराच्या भिंतीलगत विटांचे एक छोटे घर बनवले होते. त्या मध्ये एक दुसऱ्या पक्षाचे मोठेसे घरटे ठेवले होते. सगळी तयारी आधीच झाली होती. फक्त पिल्ले आणायची होती ती पण कुणाच्या नकळत. एक दिवशी संध्याकाळी एक नायलॉनची पिशवी घेऊन तो शाळेकडे गेला. शाळेपाशी सामसूम होती. घरटे असलेल्या खांबाजवळ आला. नर किंवा मादी या पैकी घरट्यात कोणीतरी एक होते. मादीच असावी. वैभव खांबावर चढू लागला तशी मादी घाबरून उडून जाऊन पलीकडच्या खांबावर बसली. वैभवने खांभावर चढून हळूच एक एक करून दोन्ही पिल्ले पिशवीत ठेवली. हे लांबून पक्षीण पाहुन सैरभैर झाली. पण ती काय करू शकणार नव्हती. वैभवने नेहमीप्रमाणे खांबावरून न उतरता आज अर्ध्या वरून उडी मारली आणि झपाझप पावले टाकत तो घराकडे वळला. आधीच अंधार दाटलेला,तो तसाच परड्यात गेला आणि भिंतीलगत बांधलेल्या विटांच्या घरातील घरट्यात त्या दोन पिल्लांना ठेवले. विटांनी ते छोटेसे घर व्यवस्थित बंद केले आणि तो घरात गेला. पिशवी एका कोपऱ्यात भिरकावली आणि जोंधळ्याच्या पोत्याजवळ गेला. पोत्याला असलेल्या लहान छिद्रातून अर्धी मूठ जोंधळा काढला आणि तो परड्याकडच्या दरवाज्यातून बाहेर पडला अन ती अर्धी मूठ त्या घरट्यात मोकळी करून आला.आता त्याला एक चिंता भेडसावत होती की पिलांना पाणी कशात ठेवायचे. इकडे तिकडे दोन घिरट्या खालून तो स्वयंपाक घरात शिरला. तसे आई त्याला म्हणाली
" काय चाललंय तुझं , पिशवी घेऊन काय केलास?"
" काय चाललंय तुझं , पिशवी घेऊन काय केलास?"
कायतरी सांगायचे म्हणून वैभव बोलला " अभ्यासाची वही आणायला गेलतो"
आई भाकरी बडवण्यात व्यस्त झालेली पाहून याने हळूच एक कपाटातील वाटी उचलली आणि मुकाट्याने चालू लागला. त्याला वाटले आईचे लक्ष नसावे पण आईच ती " वाडगा काय कराय "?
तसे वैभवला काय सुचेना. तो पाहिजे मला म्हणून तसाच बाहेर आला . आईने पण दुर्लक्ष केले. त्याने हळूच घागरीतील पाणी वाटीत ओतले आणि परत पाठच्या दरवाजातून बाहेर पडला. अंधारात सावकाश पिल्लांजवळ आला . एक विट थोडीशी कोरी केली आणि पाण्याची वाटी आत ठेवली, नंतर परत वीट होती तशी लावली .
सकाळी उठल्या उठल्या त्याने पिल्ले गाठली. हळूच एक वीट कोरी केली. पिल्ले तर होती पण निस्तेज दिसत होती. दादा काय करतोय म्हणून सोनी पण दादा जवळ आली. तिने ती पिल्ले पहिली तशी ती ओरडली " अय्या , कसली पिल्लं ही" ?
सकाळी उठल्या उठल्या त्याने पिल्ले गाठली. हळूच एक वीट कोरी केली. पिल्ले तर होती पण निस्तेज दिसत होती. दादा काय करतोय म्हणून सोनी पण दादा जवळ आली. तिने ती पिल्ले पहिली तशी ती ओरडली " अय्या , कसली पिल्लं ही" ?
ते ऐकून आई पण बाहेर आली. तिने पिल्ले पाहिली आणि जोराचा एक वैभवला पाठीत गुद्दा घातला. " कशाला आणलास ? मरायला काय ? होती तिथं ठेवून ये जा ती".
वैभव तसाच गप्प उभा. तशी आई म्हणाली " काय सांगालोय , जा ठेवून ये जा. नायतर बाबाकण मार खातोस बघ"
वैभव - " पिल्लं बाळगायची हाइत मला"
आई - " मांजरं खाऊन टाकतील तुझी पिल्लं, इथं कोंबड्या राहिनात आणि ह्यो पिल्ली बाळगतोय". सोडून आलास तर बरं".
वैभव - " हम्म"
तशी आई गेली . त्याने सोनीकडे हात वर करून मार द्यायला पाहिजे तुला असा हावभाव केला. परत ते त्या पिल्लांना पाहण्यात गुंतले.
वैभव ने एका पिल्लाला हातात घेऊन त्याची चोच वाटीतील पाण्यात बुडवली त्याने पाणी पिले की नाही हे काही समजले नाही. दुसऱ्या पिल्लाला पण त्याच प्रकारे त्याने पाणी पाजायचा प्रयत्न केला. पिल्लांनी धान्य खाल्ले नव्हते.अजून ती स्वतः खाण्याइतकी मोठी पण झाली नव्हती. परत आईची हाक आली तशी दोघेही वीट बंद करून आत पळाले. मग आत चहा वैगरे घेऊन दोघे हळूच परत बाहेर आले. वैभवने सोनीला शेंगदाणे आणायला सांगितले. सोनीने पळत जाऊन शेंगदाणे आणले. वैभवने जवळ असलेल्या पसरट दगडावर ते शेंगदाणे बारीक केले. सोनी हे सर्व कुतुहलाने पाहत होती. दादाने बारीक केलेले शेंगदाणे तिच्या हातात दिले आणि एका पिल्लाला बाहेर काढले. त्याची हळूच हाताने चोच उघडून त्यात बारीक केलेल्या शेंगदाण्याचा एक तुकडा टाकला. थोडा वेळ तो तसाच थांबला. पिल्लाने तो तुकडा गिळला तसे वैभवला बरे वाटले. मग त्याने थोडे थोडे करून दोन्ही पिल्लांना शेंगदाणे भरविले. पुन्हा दोघांची चोच पाण्याच्या वाटीत हळूच बुडवली. परत सर्व बंद करून दोघे बहिणभाऊ घरात गेले आणि शाळेची तयारी करून शाळेला गेले. शाळेत गेल्यावर पण त्याचे शाळेत लक्ष नव्हते. कधी एकदा दुपारची सुट्टी होईल असे झाले होते आणि एकदा दुपारची घंटा झाली तसा पळत वैभव घराकडे सुटला. आधी त्याने जाऊन पिल्ले पाहिली . आता ती बऱ्यापैकी हालचाल करत होती. विटांवर उन्हे येत होती म्हणून त्याने झाडाचा पाला तोडून विटांवर टाकला आणि जेवण करून शाळेला गेला.
दोन चार दिवस असेच गेले. रविवारची सुट्टी आली. पिल्ले आणलेली घरी सगळ्यांना माहीत झाले होते. बाबानी ऐकवले होते तरी त्याने आपला हट्ट सोडला नव्हता. रविवारची सुट्टी असल्यामुळे त्याला बाबा सोबत गवत आणायला शेताला जावे लागले. नऊ - साडे नऊच्या सुमारास तो शेतातून आला. कुठे ही गेला कि त्याचा जीव पिल्लामध्ये अटकत होता. आल्या आल्या तो पिल्लाकडे धावला . गेल्या गेल्या विटांनी बनवलेल्या छोट्याशा घराची एक वीट तशीच उघडी दिसली तसा तो चरकला . त्याने लगेच पिल्ले आहेत का पाहिली , पण त्याला काय पिल्ले दिसली नाहीत. त्याने आजूबाजूला पाहिले पण पिल्ले दिसायची शक्यता कमीच होती. आता सैरभैर होण्याची त्याची वेळ होती . तो घरात पळत गेला आणि बहिणीला विचारले
दोन चार दिवस असेच गेले. रविवारची सुट्टी आली. पिल्ले आणलेली घरी सगळ्यांना माहीत झाले होते. बाबानी ऐकवले होते तरी त्याने आपला हट्ट सोडला नव्हता. रविवारची सुट्टी असल्यामुळे त्याला बाबा सोबत गवत आणायला शेताला जावे लागले. नऊ - साडे नऊच्या सुमारास तो शेतातून आला. कुठे ही गेला कि त्याचा जीव पिल्लामध्ये अटकत होता. आल्या आल्या तो पिल्लाकडे धावला . गेल्या गेल्या विटांनी बनवलेल्या छोट्याशा घराची एक वीट तशीच उघडी दिसली तसा तो चरकला . त्याने लगेच पिल्ले आहेत का पाहिली , पण त्याला काय पिल्ले दिसली नाहीत. त्याने आजूबाजूला पाहिले पण पिल्ले दिसायची शक्यता कमीच होती. आता सैरभैर होण्याची त्याची वेळ होती . तो घरात पळत गेला आणि बहिणीला विचारले
" तू गेली होती का तिकडे ? "
पण तिनेही नकारार्थी मान डोलावली तसे तो मोठ्याने रडू लागला . ते ऐकून आईने विचारले काय झाले रडायला. तसा तो म्हणाला
" तिथं पिल्लं नाहीत"
आई - " सांगितलं तर ऐकतोस कुठं " खाल्यासतील मांजराने"
वैभव - " मांजर काय विटा काढून खातंय" ? ' कोण तरी वीट काढलेली"
तसे त्याने सोनीकडे पाहिले. तशी ती घाबरीघुबरी झाली. कारण तीच पिल्ले बघायला गेली होती आणि वीट लावायची विसरून गेली . त्याने ओळखले तसे तिच्या डोकीवर जोरात दोन चार फटके मारले अन म्हणाला
" हिनच उघडलेलं"
" हिनच उघडलेलं"
मार बसताच तिनेही भोंगा पसरला. आईने सोनीला मारलेले पाहताच हातात काठी घेतली तसा वैभव रडत बाहेर पळाला. तसाच तो रडत त्या रचलेल्या विटांवर जाऊन बसला. त्याची पिल्ले गायब झाली होती. मांजराने खाल्ली की काय झाले हे त्यालाही माहीत नव्हते. त्याने मनाशी निश्चय केला कि परत पिल्ले कधी घरी आणायची नाहीत. त्यांना जगू द्यायचे ते त्यांच्या घरात , त्यांच्या घरट्यात . अजूनही त्याच्या डोळ्यातून आसवे वाहत होती.
समाप्त.
No comments:
Post a Comment