मे महिना शेवटाला लागला होता. यात्रेसाठी आलेले मुंबईकर परतीला लागले होते . यात्रेच्या आठवड्यात गाव कसे ओसंडून वाहत होते. गावात मुंबईकर आले की एक वेगळाच उत्साह सळसळत असायचा. मे च्या सुरुवातीला एक एक मुंबईकर गावी उतरायला लागला की मस्त वाटायचे. भले तो आपल्या घरचा नसला तरीही. आता बरेचसे मुंबईकर परतले होते . त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही. पाऊस सुरू होण्यापूर्वी सुखरूप पोहचलेले बरे म्हणून मुंबईकर मे संपायला रवाना होतात. पंधरा दिवस गजबजलेलं गाव आता भकास वाटायला लागते. त्यात उन्हाळा एवढा मरणाचा असतो की कुठेच मन रमत नाही . ही अवस्था सगळ्यांचीच झालेली असते. असाच अजित कट्टयावर एकटा उदास चेहरा करून बसलेला. दोन दिवसांपूर्वी वळीव जोराचा पडला होता त्यामुळे गरमा आणखी वाढला होता. जीवाची नुसती काहिली काहिली होत होती. अजितचे पंधरा दिवस कसे भुर्रकन उडून गेले हे त्याला कळलेही नव्हते. त्याच्या शेजारी असणारे तन्मय - चिन्मय कालच मुंबईला परतले होते. त्यांचा निरोप घेताना याच्या डोळ्यात पाणी साचले होते. चिन्मय - तन्मयचे वडील मुंबईलाच राहतात त्यामुळे ते दिवाळी आणि मे मध्ये फॅमिली सोबत गावी पंधरवडा येत असतात. एरव्ही त्यांच्या घराला कुलूप असतो. नाही म्हणायला गावात घरपती मुंबईकर होता. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी घर मोकळे मोकळे वाटत असणार.
अजित यावर्षी तिसरीतुन चौथीत जाणार होता. शाळा चालू व्हायला अजून दहा दिवस शिल्लक होते. त्याने सकाळीच गल्लीतल्या मित्राच्या घरी एक राऊंड मारून आला होता पण त्याच्या मित्राच्या घरी अजून कोणीतरी पाहुणे होते म्हणून बाहेरूनच परतला. यात्रा संपल्यावर दोन तीन वळीव झाले होते. आता हळूहळू सगळे शेताकडे सकाळ - संध्याकाळ जाऊ लागले होते. दुपारच्या या उन्हात तर कामे होणार नव्हती. अजितला सकाळची ड्युटी होतीच, म्हैशी फिरवून आणायची. फक्त ती यात्रेत चार दिवस चुकली होती. म्हैशीना चरायला तर काही नव्हते पण तेवढेच त्यांचे पाय हलखे करून धरणाला धुऊन आणायचा. गावातील जाणती मंडळी भाताची सड , उसाची खोडवी वेचायला जायची. शेत साफ केले तर पिकणार. अजितच्या घरची शेती अशी जास्त नव्हती. अर्धा एकरच्या जवळपास होती. ती पण एक ठिकाणी नव्हती. एक तुकडा वरच्या माळाला आणि एक पान माळ्याजवळ . माळाला भुईमूग असायचा आणि दुसरीकडे पावसाळ्यात भात थोडंफार व्हायचे आणि हिवाळ्यात झाला तर थोडा हरभरा. घरचे पाणी नसल्यामुळें पुढच्या पिकाचे काही खरे नव्हते. त्यामुळे त्याचे आई-वडील रोजदंरीवर पण कामाला जायचे. उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असतात त्यावेळी ते गवंड्याच्या हाताखाली जायचे.
आता सगळे पुन्हा जुने मित्र भेटू लागले . एकत्र खेळू लागले. गल्लीतील पोरे या दरम्यान शेंगा फोडायला दुसऱ्याच्यात जात असत. यावर्षी पण गल्लीतील पोरे दुपारी शेंगा फोडायला जाऊ लागली होती. ज्याची भरपूर शेती असायची त्यांना पेरणीला शेंगदाणे भरपूर लागणार होते . मग एवढे शेंगदाणे घरच्याने काय फोडून होणार नव्हते. मग आजूबाजूच्या गल्लीतल्या पोरांना बोलविले जायचे. एक मापट्याला ५० पैसे दिले जायचे. मोठी सहावी - सातवीची पोरे दोन दोन मापटी फोडून रुपया घेऊन जायची. अजित लहान असल्याने त्याला कोणी बोलवत नव्हते. शिंद्यांचं भुईमुगाचं रान भरपूर होते. तिकडे दोन दिवस पोरे शेंगा फोडायला जात होती. दिन्या पण तिकडेच चालला होता . दारात खेळतेल्या अजित ला बघून म्हणाला
" आज्या , येतोस का शेंगा फोडायला , मापट्याला आठ अणे देत्यात. "
अजित कसानुसा चेहरा करत म्हणाला - "माझं मापटं भरलं का ?"
दिनेश - " आरं चल भरलं तर भरलं नायतर यीस परत ".
अजितला पण त्यांच्या सोबत जावे वाटायचे पण कधी कोण त्याला बोलवत नव्हते. घरी तर त्याला कधी खायला पैसे मिळायचे नाहीत. त्याला पैसे मिळाले की क्रिकेटचे स्टिकर जमवायचे होते . सौफच्या पुडीत क्रिकेट प्लेअरचे स्टिकर असायचे आणि मसाले वाली सौफ . आज संधी आली आहे तर त्याला दवडायची नव्हती. दिनेश त्याचा गल्लीतला मित्र. गल्लीच्या शेवटाला रहायचा. दोघे शिंद्यांच्या घरात गेले . आधीच बरीच पोरे पेले (ग्लास ) , चिट्टी (धान्य मोजायचे लहान माप ), मापटे , भांडी घेऊन शेंगा फोडायला बसली होती. याना बघून शिंद्याची म्हातारी म्हणाली
" येवा रं पोरानु , बसा हिकडं . "
शेंगचे एक मोठे पोथे आडवे केले होते . सगळे त्याच्यातल्या शेंगा घेऊन फोडत बसले होते. दिनेश आणि अजित पण शेंगा फोडायला बसले. त्यांना पण दोन भांडी दिली. भांडी जरा मोठीच होती. शिंद्याच्यानी आज जवळ जवळ अर्धी भांडी बाहेर काढली की काय असे वाटत होते. अजितच्या शेतात शेंगदाणे लागायचे पण थोडेच. त्यांचे शेतच होते केव्हढे. घरचे शेंगदाणे फोडताना हा वाटी, ग्लास , चिट्टी घेऊन बसायचा. पहिला वाटी भरायचा , मग वाटी - वाटीने ग्लास , आणि ग्लास ने चिट्टी..मापट्या पर्यंत काय मजल गेली नव्हती. इथे तर त्याला मोठे भांडेच मिळाले होते. दहा मिनिटे झाली अजून तर त्याचा तळ पण भरला नव्हता. शेंगांचे(बियाणे) पण बरेच प्रकार होते. काही फोडायला हलक्या जायच्या तर काही जड. तशा खायला ही काही जड होत्या म्हणजे पचायला. काळू- बाळू , फुलप्रगती या शेंगा फोडायला हलक्या जायच्या पण अन्यगिरी लई जड . त्याची टरफल कडक असायची . फोडून फोडून मोठ्यांची बोटे दुखायची तर लहानांचे काय? . तास- दीड तास गेला, हळूहळू पोरे पैसे घेऊन पांगू लागली. दिनेश चे मापटे भरले त्याने ते म्हातारीला दाखवले आणि पैसे घेऊन तोही जाऊ लागला. त्यावेळी अजित त्याला म्हणाला
"थांब की माझं बी भरायला आलंय"
दिनेश - "घरला जाऊन येतो लगेट , म्हातारं बाबा एकटाच हाय घरात "
अजितचा नाईलाज झाला . त्याने फक्त मुंडी हलवली. तसा दिनेश निघून गेला. १५- २० मिनिटे झाली तरी अजितचे काय मापटे भरले नाही.अजून वाटी - दीड वाटी शेंगदाणे फोडावे लागणार होते. त्याला कंटाळा आला होता आणि आता आपल्याच्याने काय मापटे भरणार नाही असे वाटू लागले. पण समोर म्हातारी फोडलेल्या शेंगाची फोलपटे गोळा करत होती. म्हणून हा गप्प एक एक शेंग फोडत होता. अजून तरी दिनेशचा काही पत्ता नव्हता. थोड्या वेळाने म्हातारी कायतरी आणायला आतल्या सोप्यात गेली तसे
अजित जागेवरून उठला , इकडे तिकडे पाहिले. दुसरा कोणी असता तर जवळ भरलेल्या शेंगदाण्याच्या बुट्ट्या मधून शेंगदाणे घेऊन भरलेलं मापटे दाखवून पैसे पदरात पाडले असते पण अजित तसे काही न करता शेंगदाण्याने भरायला आलेले मापटे तिथेच ठेऊन घराच्या बाहेर पडला. अजितच्या मनात काय आले काय माहित. पायात चप्पल सरकवली आणि घराकडे धूम पळाला.
समाप्त
खूप छान
ReplyDelete