Saturday, May 29, 2010

किल्ले कमलगड

वाई हा सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. इतिहासकाळापासून प्रसिद्ध असलेल्या वाई तालुक्यामधे सहा किल्ले आहेत. कृष्णेचा काठ लाभलेल्या वाईच्या पश्चिमेला कमळगड नावाचा लहानसा पण समुद्रसपाटीपासून १३७५ मी. उंचीचा किल्ला आहे.

वाई गाव हे पुणे तसेच सातारा शहरापासून गाडीमार्गाने जोडले गेले आहे. पुणे बेंगळुरु मार्गाच्या पश्चिमेला १० कि.मी. अंतरावर वाई आहे. वाई मधूनच पाचगणी आणि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीमार्ग आहे.

वाईच्या पश्चिमेला धोम धरण आहे. धोम धरण कृष्णा आणि वाळकी नद्याच्या संगमावर बांधले आहे. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. या फुगवट्याने कमलगडाला तिन बाजुने विळखा घातला आहे. त्यामुळे कमळगडाला जाण्यासाठी लांबचा वळसा घेवून जावे लागते.

कमळगडाला उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडूनही जाता येते. वाई मधून जोर या गावाला जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावर वयंगाव नावाच्या गावात उतरुन कृष्णा ओलांडून कमळगड गाठता येतो. पण अधिक सोयीचा मार्ग म्हणजे धोम धरणाच्या दक्षिण तीरावरुन जाणारा मार्ग. या मार्गाने मेणवली, खावलीकडून वासोळे गावाला पोहचणे. वासोळे पर्यंत गाडी मार्ग असून एस. टी. ची सेवा ही उपलब्ध आहे.

वाईच्या या पश्चिम भागात सह्याद्रीच्या तीन उपरांगा आहेत. महाबळेश्वर, कोल्हेश्वर आणि रायरेश्वर अशा नावानी या रांगा ओळखल्या जातात.

कोल्हेश्वराच्या दक्षिणेकडे महाबळेश्वर रांग बसून उत्तरेकडे रायरेश्वराची डोंगररांग आहे. कोल्हेश्वराच्या पूर्व टोकाजवळ कमलगडाचा किल्ला आहे. पायथ्याच्या वासोळे गावातून कमलगडाचा पायी मार्ग आहे. मार्गावर पाणी नाही त्यामुळे खालूनच पाणी भरुन घेणे गरजेचे आहे. या मार्गावरचा चढ हा छातीवरचा असल्यामुळे वरच्या पठारावर पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. तासा दिड तासात आपण पठारावर येवून पोहोचतो. येथून डावीकडे कमलगड आहे. डावीकडे वळाल्यावर झाडीचा पट्टा सुरु होतो. येथील एका वहाळाला स्वच्छ पाणी असते.

या झाडीतून आपण पठारावरील धनगराच्या झापाजवळ पोहोचतो. झापाजवळ झाडी तोडून येथे शेती केलेली आहे. झापाच्या मागे काहीशा उंचीचा कमलगडाचा माथा उठावलेला दिसतो. माथ्याच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. माथा उजवीकडे ठेवून वळसा मारल्यावर घळीतून चढून गडावर पोहचता येते.

माथा उघडा बोडका असल्यामुळे आजुबाजूचा सह्याद्री आपल्यासमोर नव्या रुपात उभा ठाकलेला दिसतो. कमलगडावर ऐतिहासिक वास्तूंचा अभावच आहे. पण येथील विहीर मात्र प्रसिद्ध आहे. हिला कावेची विहीर म्हणतात. खोल असलेल्या विहीरीमध्ये उतरण्यासाठी पायर्‍या आहेत.

कमलगडावरुन चंदन, वंदन, नांदगिरी, वैराटगड, पांडवगड, केंजळगड तसेच पाचगणी, महाबळेश्वर आणि रायरेश्वरचे पठार उत्तम दिसते. धोमचा जलाशय आणि वाई परिसरही नजरेत येतो.

सह्याद्रीचे देखणे रुप मनात साठवूनच आपण परतीच्या प्रवासाला निघतो ते सह्याद्रीला एक सलाम करुनच.



  • प्रमोद  मांडे
  • No comments:

    Post a Comment