Saturday, May 29, 2010

अजिंठा लेण्याची सौंदर्य वृध्दी


एप्रिलचा दुसरा आठवडा. उन्हाचा तडाखा वाढलेला. पण अशा प्रतिकूल वातावरणातही औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा डोंगरातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटकांची गर्दी झालेली दिसत होती. रणरणत्या उन्हातही पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनेक शतकांपासून विविध नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड देत ही जगप्रसिद्ध लेणी गौतम बुद्धांचा जतन केलेला शांतीचा संदेश जगभर पोहचवित आहेत. युनेस्कोने जागतिक स्मारकांच्या सूचीत समाविष्ट केलेल्या या स्मारकाचे जतन व देखभाल करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कंटूर ड्रेनव्दारे जागतिक स्मारक असलेल्या या लेण्यांचे सौंदर्य व आयुष्य वाढावे म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत.
वाघोरा नदीच्या जवळ घोड्याच्या नालेसारखा आकार असलेल्या डोंगररांगांमध्ये ७६ मीटर उंचीवरील अजिंठा लेणी पाहताना इतिहासाच्या गूढ गुहेत गेल्यासारखे वाटत होते. बेसाल्ट खडकात कोरलेल्या ह्या ३० लेण्यांमधील भित्तीचित्रे आणि माणसांहूनही जिवंत वाटावीत अशी शिल्प पाहताना आपण केवळ थक्क होतो. येथील भव्य चैत्यगृहे आणि विहार यांतील शिल्पकला आणि चित्रकला पाहून पर्यटक क्षणभर स्तंभित झाल्याशिवाय राहत नाहीत. लेण्यांमधिल शिल्प आणि चित्रांच्या जतनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत करण्यात आलेले प्रयत्न लेण्यांमध्ये जागोजागी दिसून येत होते. या प्राचीन चित्रांच्या आणि शिल्पांच्या जतनासाठी तसेच या चित्रांचे आणि लेण्यांचे आयुष्य वाढावे यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत दरवर्षी नित्याच्या देखभालीची कामे तसेच खास देखभालीची कामे करण्यात येतात. सर्व लेण्यामध्ये कमालीची स्वच्छता दिसत होती. लेण्यांमधिल शिल्प आणि चित्र पाहता यावीत यासाठी फायबर ऑप्टिक लाईटसचा वापर करण्यात आल्याचे आढळले.फायबर ऑप्टिक लाईटसच्या पडणा-या प्रकाशामुळे लेण्यांमधिल चित्र आणि शिल्प यांना कोणतीही हानी पोहचत नाही तसेच याव्दारे निर्माण होणारी उष्णता बाहेर फेकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
खास देखभालीच्या कामांमध्ये लेण्यांच्या संरक्षणाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे अधिक्षण पुरातत्वविद व्ही.एन.प्रभाकर यांनी सांगितले. खडक निखळून पडणे, लेण्यांमध्ये पाणी झिरपणे असे प्रकार या लेण्यांमध्ये अनेकदा होतात. याला आळा घालण्यासाठी कंटूर ड्रेनव्दारे पावसाळ्यात डोंगररांगांमधून वाहत येणारे पाणी लेण्यांमध्ये येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. पावसाळ्यात या लेण्यांमध्ये कातळातून झिरपणारे पाणी तसेच लेण्यांच्या दर्शनी भागावर डोंगर उतारावरून वाहणार्‍या पाण्याचा विपरित परिणाम होतो. प्राचीन काळात या लेण्या खोदतानाच लेण्यांच्या वरील भागावर कातळात पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली खोदल्या होत्या. या आधारावरच यापुर्वीच भारतीय पुरातत्व विभागाने दोन समपातळीतील नाले खोदले. २००९-१० मध्ये सर्वात मोठा नाला तयार करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाने हाती घेतले आणि हे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा नाला डोंगरउतारावर समपातळीत खोदला असून त्यामुळे पावसाच्या पाण्याचा लेण्यांपर्यंत पोहचण्या मार्ग दुसरीकडे वळविण्यात आला आहे. हा नाला साधारण ४०० मीटर लांबीचा असून लेणी क्रमांक १० ते २० वर येणारे पावसाचे पाणी वळविण्यासाठी याचा उपयोग हाणार आहे.कंटूर ड्रेनच्या ( Contour drain ) या कामामुळे दर्शनी भागावर तसेच लेण्यांच्या आतमध्ये पाण्याचे पाझरणे बंद होण्यास मदत होईल व चित्र, शिल्प आणि नक्षिकाम यांचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे संरक्षण सहायक ज्ञानेश्वर दानवे व सहायक पुराविद श्री तेजस गर्गे यांनी सांगितले.
कंटूर ड्रेनच्या या कामाबरोबरच लेणी क्रमांक १ ते ४ च्या माध्यावरील कच्चे कातळ व सुटे दगड आरसीसीच्या साह्याने मजबूत करण्याचे काम करण्यात आले आहे. या प्राचीन लेण्यांमधिल अनेक मूर्ती झिजलेल्या आहेत तर अनेक मूर्ती भंगलेल्या स्थितीत आहेत. या झिजलेल्या आणि भंगलेल्या मूर्तींच्या पुनर्बांधणीसाठी स्टोन पावडर आणि इथाईल सिलिकेट यांच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या रासायनिक विभागामार्फत चित्रांच्या जतनासाठीही खास प्रयत्न केले जात असल्याचे आढळले. फायबर ऑप्टिक लाईटसचा लेण्यांमधिल वापर हे त्याचेच एक महत्वाचे उदाहरण म्हणता येईल. या सर्व जतनाच्या कामाद्वारे पर्यटकांच्या संरक्षणाचीही काळजी घेण्यात आली आहे आणि याबरोबरच या जागतिक वारसा असणा-या जगप्रसिद्ध लेण्यांचे सौदर्य व आयुष्य वाढण्यासही मदत होणार आहे.
केशव करंदीकर

No comments:

Post a Comment