Saturday, May 29, 2010

नाशिकचे वेरुळ


नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या संग्रहालयातील शैलशिल्पं आवर्जुन पहा असे सांगितले. या संदर्भाच्या ओढीनेच संग्रहालयात गेलो. इथल्या शिल्पांच्या या मेळयात संग्रहालयातील हत्यारे, नाणी आदि ऐतिहासिक कलावस्तु असतांनाही मनाचा ताबा काळयाभोर शिल्पांनी घेतला.
नाशिकच्या फाळके स्मारक परिसरातील हे संग्रहालय १९८६ मध्ये स्थापन करण्यात आले. पण अनेक जागा बदलत ते आता सन २००० मध्ये फाळके स्मारक परिसरात स्थिरावले आहे. प्रादेशिक रचना असलेल्या या संग्रहालयांतर्गत नाशिक, धुळे,नंदुरबार ,अहमदनगर व जळगांव असा भाग आहे. हाच भाग पुरातत्वदृष्टया, एîतिहासिक वास्तू कोरीव मंदिराच्या हिशोबाने श्रीमत. या संग्रहालयाचे तीन दालने आहेत. पुरातत्वीय वस्तु, नाणी हत्यारे आणि तिसरे ते शिल्पांचे. या विभागातर्फे थाळनेरच्या किल्लयात १९८९ व १९९२ मध्ये उत्खनन करण्यात आले. फारुखी घराण्याची ही राजधानी. त्यांच्या या इतिहासावरच या उत्खनातून प्रकाश पडला. यातील खापरांची भांडी, बांधकामातील विटा, वस्तु, मणी काचांचे दागिणे या सा-यातून पुरातत्व विभागाचे हे दालन सजले आहे.
हत्यारे नाणी विभाग तर नाशिक भोवलाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडतात. सातवाहन ते पेशवाई असा भलामोठा नाण्यांचा हा प्रवास. या नाण्याबरोबरच इथे धातुच्या मूर्ती, देवता , टाक, काष्टशल्पि आदीचेही दर्शन घडते. कटयारी , तलवारी ते ठासणीच्या बंदुका हया हत्या-यांचे दर्शन घडते. यात सुवर्णपानी लावलेला दास्ताना , खड्ग ,तेगे,दुधारी तलवार हे विशेष आकर्षण ठरतात..यात सर्वात जास्त लक्ष जाते ते पेशकाब कटयारीकडे.राजस्त्रियांचे हत्यार असलेल्या या पेशकाब त्यांच्याप्रमाणे श्रीमंती मेकअप केलेल्या एकीच्या हस्तिदंतती मुठीवर तर किंमती खडे जडवलेले, हत्यां-यांच्या दालनात राजस्त्रियांच्या या पेशकाब भाव खात असतात आणि शेजारी लढाईत घाम गाळुन थकलेल्या तलवारी मात्र आयुष्याचा हिशोब जुळवत असतात.
संग्रहालयाच्या या अन्य आकर्षणामधुन ख-या खु-या लेणीत शिरले तर माणुस स्थितप्रज्ञ होतो. तब्बल कोरीब ३१ मूर्तीचे हे लेणे पण सारी शिल्पे महाराष्ट्रातील आगळीवेगळी ,दुर्मिळ संग्रह ठरावी अशी. विष्णु, भूदेवी, चामुंडा, महिषासुरमर्दिनी, गणेश, नृत्यगणेश, महावीर, अन्य जैन तीर्थकर, गोमटेश्वर , गौतम बुध्द , यक्ष, गंर्धव, आणि अशाच कितीतरी शिल्पांचा हा मेळा कला , संस्कृती , इतिहास आणि परंपरेचे हे समुच्च दर्शन होय.
साधारण पाचव्या शेतकापासुन ते बाराव्या शतकादरम्यान घडविलेली ही शिल्पे जशी ती विषयांनी निराळी तशीच ती कला, काळ आणि पाषाण, सॅन्ड स्टोन इथपासुन ते स्लेट नावाच्या आपल्या पाटीच्या दगडात कोरलेलीही काही शैलशिल्प आहेत. एकापाठी विष्णुच्या येणा-या सहा विविध मुद्रांनीच याशिल्पदर्शनाची सुरुवात होते. मुळात विष्णूची मूती तशी दुर्मिळ, पण इथे एकाच ठिकणी त्याची सहा आगळी रुपे पाहण्यास मिळतात. शंख, चक्र, गदा आणि पद्य ही त्यांची प्रमुख आयुधे या आयुधामध्येच वेगवेगळया क्रमाने बदल करत गेल्यास त्यातून २४ प्रकार तयार होतात. दोन अडीच फुट उंचीचे हे शिल्प - स्थिर प्रवृत्ती,शांत प्रसन्न चेहरा, जवळच दशावतार आपणास खुणवतात , मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम आणि बलराम अशी या आठ अवतारांची इथे खास प्रभावळ रेखाटली आहे. पुढे गेल्यावर त्रिभंगावस्थेतील चामुंडा येते, दुगेच्या रुपातील महिषासुरमर्दिनही दर्शन देते. आसनस्थ गणेशाबरोबर नृत्यतल्लीन गणे पुढयात येतो. एरवी अन्यत्र पाय दुमडलेला या नृत्यगणेशाची इथे पायाबरोबरच बोटेही दुमडलेली दाखवली आहेत. शैलशिल्पाचा हा बारकावा, बदल कलाकराचे मनच दाखवत असतो. भुदेवीचे शिल्प तर यासा-यात अनोखे दुर्मिळ , विष्णुची ही पत्नी जणू सा-या भोवतालावरच प्रसन्न होत वास्तव्य करुन असते.
भगवान महावीर, गौतम बुध्दाची शिल्प पुढे येतात आणि त्या परमात्म्याचा शोध, सर्व परित्यागाची भावना मनी दाटून येते. जैन तीर्थकरांची ती रुपे, गोमटेश्वराचे ते रेखीव शिल्प हाच संदेश देत पुढेउभी असतात. मकर, तोरण, व्दारपट्टी , यक्ष, गंधर्व, ही शिल्प शब्दांत व्यक्त होत नाही. गौतम बुध्दाच्या त्या प्रसिध्दी शिरोमुख शिल्पापुढे आपण उभे ठाकतो. या कलेची संस्कृतीची सारी श्रीमती सौदर्य हे या एका शिल्पात सामावलेले दिसते. शिल्पांच्या या मेळयातुन बाहेर पडतांना कला, सौदर्य, आणि प्रसन्नतेने उजळलेले हे संजीवन चेहरेच समोर उरतात. याला संग्रहालय म्हणावे की ईश्वराचे लेणे हा प्रश्न पडतो. नजरेसमोर अवघे नाशिकचे वेरुळ साकारलेले असते.

पंडीत महाले

No comments:

Post a Comment