गाडी निघाली... आणि विदर्भाच्या काशी मार्कंडेश्वर विषयी माझ्या मनात विचार सुरु झाले. गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगल, दर्याखोर्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे येथे अनेक निसर्गरम्य व विलोभनिय नद्यांचे संगम व ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. यापैकीच एक विदर्भातील काशी म्हणुन ओळखले जाणारे मार्कंडेश्वर हे भाविकांचे तिर्थस्थळ म्हणुन ओळखले जाते. गडचिरोली पासुन ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्याच्या वायव्य दिशेला मार्कंडा देवस्थान आहे.
उत्तर वाहीनी वैनगंगेच्या काठावर वैभवशाली इतिहासाची साक्ष देत व उत्कृष्ट शिल्पकलेची आठवण करुन देणारे मार्कंडा देवालय आहे. मार्कंडेय ऋषीच्या नावाने ओळखले जाणारे मार्कंडेश्वराचे हेमाडपंथी् मंदिर आज अनेक शतकापासून दिमाखात उभे आहे. मंदिराच्या बाहेरील भागावर कोरलेल्या शिल्प कलाकृती पाहून वेरुळ-अजिंठा व खजुराहो याची आठवण होते. मंदिराच्या गाभार्यात ज्योतिर्लिंग असून या ज्योतिर्लिंगाच्या खाली भुयारीवाट असल्याची अख्यायिका आहे. मंदिराच्या सभोवतील परिसरात अनेक लहान मोठ्या मंदिरे असून काही मंदिराचे भग्न अवशेष पाहावयास मिळतात. मंदिराजवळ ज्योतिर्लिंग असून मंदिराला लागुन भुवनेश्वर, गणपती, हनुमान महिषासुर मर्दिनी यासारखी लहान-मोठे मंदिरे आहेत. मुख्य मंदिरापासून उत्तर वाहिनी वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे याठिकाणी बांधण्यात आलेल्या घाटामध्ये भाविकांची स्नान करण्याकरीता गर्दी असते.
दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्री निमित्त यात्रेला प्रारंभ झाला असून मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्याकरीता विदर्भातुन व अन्य राज्यातुन भाविक येतात. या काळात भाविकांना येथे जाण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणाहून एस.टी. बसेसची सोय राज्य परिवहन महामंडळामार्फत केली असून याबरोबरच स्थानिक प्रशासनाद्वारे भाविकांसाठी विविध सोयी-सुविधां उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या मंदिराचा इतिहास बघितला तर सन १८७३-७४ आणि १८७४-७५ मध्ये सेंट्रल प्राव्हिन्सेसच्या रिपोर्ट नुसार या मंदिरास सर्वप्रथम ब्रिटीश इतिहासकार सर कॅनिंगहॅम यांनी भेट दिल्याचे दिसून येते. त्यावेळी त्यांना या ठिकाणी २४ मंदिरे असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. या मंदिराचे बांधकाम दहाव्या शतकात झाल्याचे म्हटले आहे. या २४ मंदिरापैकी आता चारच मंदिरे सुस्थितीत असून २० मंदिरे भग्न अवस्थेत आहेत तर काही लुप्त झाले आहेत.
सन १९७३ च्या चंद्रपुर गॉझिटिअरमध्ये मार्कंडा मंदिर समुहाने बांधकाम राष्ट्रकुटांनी केल्याचे नमुद आहे. प्रसिध्द इतिहास संशोधक स्व. गिराशी यांच्या मतं आठव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला राष्ट्रकुट सम्राट तिसरा गोविंदा यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले असावे. विदर्भात अनेक ठिकाणी त्याचे ताम्रपट सापडले असून त्यातील उल्लेखावरुन त्याची राजधानी मयुराखंडो येथे होती. मार्कंडा किंवा मार्कंडो हे काळाच्या ओघात झालेले मयुराखंडोचे अपभ्रम्य रुप असावे असे मानले जाते. या अतिप्राचिन व सुंदर अशा विदर्भाची काशी म्हणुन ओळखल्या जाणार्या मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी भेट द्यावी ही इच्छा आज पूर्ण झाली. समोर भव्य मंदीर दिसत होत.
अरुण सुर्यवंशी
No comments:
Post a Comment